“भीमा तुमच्या जन्मामुळे
हर्षाला आसमंत सारा,
उद्धारुनी गोर गरीब
दिधला समतेचा नारा “....
सर्व सामान्य दीन दलितांच्या उपेक्षित अंध;कारमय जीवनामध्ये स्वाभिमानी जीवनाची ज्योत निर्माण करणारा महामानव,थोर अर्थशास्त्रज्ञ,आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गाढे अभ्यासक ,धुरंधर राजकारणी,निष्ठावंत समाजसेवक ,सामाजिक विषमतेवर प्राणपणाने प्रहार करणारा झुंजार वीर ,देवधर्म आणि जातींनी निर्माण केलेल्या ढोंगबाजीवर प्रहार करणारा महान मूर्तिभंजक असा त्यांचा गौरव केला जातो . नवविचारांनी प्रेरित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज सुधारणेच्या कार्याची तुतारी फुंकली.
‘’ दीन दलितांचे दु;ख अश्रु
पुसण्या धावला भिमतारा,
ज्ञानामृताची शक्ती घेऊनी
चेतविला हा भारत सारा’’….
आंबेडकरांचे शालेय शिक्षण रत्नागिरी ,सातारा व मुंबई येथे झाले. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमधून ते बी. ए. झाले. अमेरिकेतील कोलंबिया ,जर्मनीतील बोंन व इंग्लंड मधील लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स व ग्रेज इन येथील त्यांचे शैक्षणिक जीवन व वास्तव्य सुखाचे झाले. तेथे त्यांना त्यांच्या जातीबद्दल कुणी छेडले नाही;परंतु हिंदुस्थान त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात त्यांची स्पृश्य सनातनी रूढी वाल्यांनी मानखंडना केली गेली. व इथेच त्यांच्या जीवित कार्याचा संकल्प झाला.
डॉ. आंबेडकर वृत्तीने ज्ञानपिपासू , प्रचंड विद्धवता असलेले व कृतीने मूर्तिभंजक समाज सुधारक होते. अस्पृश्यतेच्या दुष्ट रूढीचे उच्चाटन करण्याचे ,आपल्या स्वबांधवांना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचे, त्यांना न्याय मिळवून देण्याचे जीवित कार्य त्यांनी पत्करले. महात्मा फुल्यांना यासाठी त्यांनी गुरु मानले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेली समाज सुधारणेची चळवळ त्यांनी हिंदू समाजाच्या सर्वात खालच्या थरापर्यंत पोहोचविली .
आपल्या स्वबांधवांना त्यांनी माणुसकीने वागण्याचा सल्ला दिला. स्वच्छतेने रहा,दारू पिऊ नका, मृत जनावरांचे मांस खाऊ नका , काम करा , कष्ट करा आणि पोट भरा. लाचारीचे जिणे नको म्हणून आपली वतने सोडण्यास त्यांनी सांगितले. घाणीची कामे बंद करा, असा आदेश त्यांनी दिला . त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बहिष्कृत भारत ,मुकनायक व जनता ही वृतपत्रे सुरू केली. अस्पृश्याची दु;खे आणि अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी “ बहिष्कृत हितकारणी सभा “ स्थापन केली.
प्राप्त ज्ञांनाचा आणि अतुलनीय वक्तृत्वाचा अवलंब करून त्यांनी दलितामध्ये स्वाभिमान पेटविला . शोषितांची अस्मिता जागृत केली. दलितांचे न्याय हक्क मिळवण्यासाठी हिंदू धर्मातील थोतांडावर घणाघाती हल्ले केले. “शिका,संघटित व्हा अन जागृत व्हा” या आंबेडकरांच्या त्रिसूत्री उपदेशामुळे मनातील खूळचट भावना झटकून देऊन दलित समाज परिवर्तन घडवू लागला. व एकसंघ समाज निर्मितीच्या मागे लागला. ही एकसंघतेची भावना जागृत होणे हीच मुळी राष्ट्रीय एकात्मतेची पायरी होय .
सामान्यातून डॉ. आंबेडकरांनी असामान्यत्व मिळविले . गुलामगिरी जाळून टाकणारा भडाग्नी होता तो. त्यात मार्दव नव्हते. विरोधाची दंड ठोकून उभी राहणारी भिमशक्ती होती ती ! या शक्तीने स्वत;ला उंचावून समाजालाही उच्च स्थानावर नेण्याचे प्रयत्न केले. समाजाची निकोप सेवा केली. त्यामुळे अस्पृश्य समाज त्यांना देव मानू लागला. माणसाला जेवढी अन्नाची गरज आहे, तेवढीच विद्येची आहे. कोणाचीही याचना न करता स्वाभिमानाने जगण्याची शिकवण बाबासाहेबांनी समाजाला दिली. तसेच माणसाने शीलसंवर्धन करायला हवे.दगाबाजी ,फसवणूक , व्यसने अशा गोष्टीपासून दूर राहावे, हेही सांगितले. अस्पृश्यामध्ये जागृती व्हावी म्हणून ३१ जानेवारी १९२० रोजी “ मुकनायक” या नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले.
महाड येथील चवदार तळ्याचा सत्यागृह, मंदिर प्रवेश,पुणे करार, धर्मांतराची घोषणा, राज्यघटना, धर्मांतर असे अनेक महत्त्वाचे टप्पे बाबासाहेबांच्या जन्मामुळे शक्य झाले. दलितांना आत्मविश्वास , स्वावलंबन आणि आत्मसन्मान बाबासाहेबांनी मिळवून दिला. त्यांनी अमेरिकेत जाऊन धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, राज्यशास्त्र ,कायदा ,इतिहास अशा अनेक विषयांचा प्रगाढ अभ्यास केला.
आर्थिक गुलामगिरीमुळे सामाजिक गुलामगिरी येते आणि ही सामाजिक गुलामगिरी राजकीय गुलामगिरीला आव्हान करते. म्हणजे पारतंत्र्याचे मूळ आर्थिक दास्यात आहे,हे आंबेडकरांनी ओळखले होते म्हणूनच त्यांनी सामाजिक विषमता नाहीशी करण्याचे ठरविले. अस्पृश्यांच्या वेदना आणि दु;ख यांच्या दाहक वणव्यात तेही होरपळून निघाले. त्यामुळेच त्यांच्या कार्यक्षेत्राला अस्पृश्यांच्या समग्र वेदनांच्या अनुभूतीचे आवरण प्राप्त झाले मोठमोठ्या मानाच्या पदव्या लिलया संपादन करूनसुद्धा त्यांचे जीवनपुष्प जातीयतेच्या पायदळी तुडविले गेले. त्यामुळे त्यांच्या रक्तपेशीत क्रोधाचा अंगार फुलला.
सामाजिक विषमता व उच्च- नीच भेदभाव यांचे समर्थन करणार्या अस्पृश्यांच्या कपाळी पिढ्यान पिढ्या दास्य लिहिणार्या मंनुस्मृतीचे दहन केले. अश्या मनुस्मृती जाळल्याने सार्या सनातनी मंडळींचे पित्त खवळले ; पण आंबेडकर आपल्या विचारापासून तसूभरही विचलित झाले नाही. मनुस्मृती जाळून हजारो वर्षे जी मानसिक व वैचारिक गुलामगिरी सहन करण्याची दुर्दैवी आपत्ती आपल्या जनतेच्या बोकांडी मारण्यात आली होती,त्या मानसिक गुलामगिरीची अक्षरश: राखरांगोळी केली.
भारतातील सर्व प्रांतांना भूगोल आहे आणि एकटया महाराष्ट्राला इतिहास आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राचाच नव्हे तर अखिल भारताचा इतिहास घडविणार्या असामान्य व्यक्ति सहयाद्रीने महाराष्ट्राला पुरवल्या आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अद्वितीय आहे. कायद्याने दिलेले माणुसकीचे हक्क मिळविण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर २० मार्च १९२० रोजी मोर्चा नेला व सामाजिक बंधनाच्या शृंखला तोडल्या. या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे तसा अस्पृश्यांचा देखील हक्क आहे हे आपल्या कृतीतून सर्वांना दाखवून दिले.
डों. बाबासाहेब आंबेडकर काही भव्य स्वप्न होती. कोणत्याही भव्य ध्येयवाद्याची ,क्रांतिकारकांची सारीच स्वप्न त्यांच्या आयुष्यात साकार होऊ शकत नाही. कारण त्याला अखंड संघर्ष करावा लागतो. जुनाट झालेली मूल्ये इतकी खोलवर गेलेली असतात की मूळापासून उपटून टाकण्याच्या प्रयत्नात आयुष्य संपून जाते. आंबेडकरानी आपल्या शक्तीने कोट्यावधी लोकांचा एक समुदाय एका गाढ झोपेतून जागा केला. त्यांना आंबेडकरानी जगण्याची जिद्द दिली.
भारतीय राज्य घटना तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल वचन केलेल्या बौद्ध शास्त्रवचनातून प्रेरणा घेतली. गुप्त मतदान , वादविवादाचे नियम आणि समित्यांची स्थापना हे ह्याच शास्त्र वचनातून घेण्यात आले. अशाप्रकारे , आंबेडकरांनी तयार केलेली घटना ही पाश्चात्य प्रारूपावर आधारलेली होती पण तीचा आत्मा भारतीय होता. सामाजिक- आर्थिक असमानता आणि संधींचा अभाव नष्ट करण्यास मदत करतील अशी अगणित कलमे त्यांनी राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली . तसेच त्यात त्यांनी वारसा हक्क, विवाह , समता या विषयीच्या कायद्यात स्त्री-पुरुष समानतेचे समर्थन केले आहे .
बाबासाहेबांनी अस्पृश्यसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. परंतू स्वतंत्र मतदारसंघाला विरोध करणार्या महात्मा गांधीच्या उपोषणाच्या निर्णयामुळे देशाच्या एका महान महात्म्याचे प्राण वाचविण्यासाठी पददलित समाजाच्या न्याय हक्कावर देखील पाणी सोडण्याचे औदार्य त्यांनी दाखविले. स्वतंत्र मजूरपक्ष स्थापन केला. स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला आणि नवभारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बनले. कायदामंत्री झाले . आपल्या बांधवासाठी अनेक सवलती मिळविल्या. स्वमत प्रतिपादनासाठी आणि लोकमत जागृतीसाठी खूप लेखन केले.
सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती यासाठी त्यांनी लेखन केले. वृतपत्रांचा वापर त्यांनी कधीच आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. विचार करण्यास भाग पाडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे . केवळ वृतपत्रातून नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स’, ‘ शूद्र पूर्वीचे कोण होते?’,’बुद्धा अँड हिज धम्म’, असे ग्रंथ लिहिले . साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाजसमीक्षक असण्याबरोबर स्वत; एक वाङमय –समीक्षक असणार्या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ,मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे .
दिन दलितचा कैवारी ,राज्य घटनेचे शिल्पकार ,महान वाचक , गाढे अभ्यासक , विनयशील ,सर्व सामान्यांचे जीवन उंचवणारे, भारतरत्न पुरस्कार , आंतरराष्ट्रीय कायदे पंडित,बॅरिस्टर , बुध्दिमान ,कर्तुत्ववान अशी अंनेक बिरुदावली असणार्या बाबासाहेबांना माझे कोटी कोटी प्रणाम .............
“ बाबा तुमचे वागणे असे की
मानवतेला अंकुर फुटावा,
बाबा तुमचे शब्द असे की
दीन दलितांना आधार वाटावा”...
लेखन -
श्री . महादेव आनंदा हवालदार
उपशिक्षक , जि. प. शाळा बांबवडे
ता ..शिराळा जि.- सांगली
मो. नंबर -८८०५५३३९३०