नागनाथ विभूते (पुणे)
कोरोना covid-19 या नव्यानेच उद्भवलेल्या साथरोग आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने वेळीच घेतला हे अतिशय कौतुकास्पद आहे, परिणामी इतर देशांच्या तुलनेत भारत तसेच महाराष्ट्र कोरोना साथरोगाच्या प्रसारबाबत चांगल्या परिस्थितीत आहे.
कडक उपायोजना म्हणून ‘लॉकडाऊन’ अंतर्गत महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमधील (द्वितीय सत्र परिक्षा) संकलित मूल्यमापन चाचणी रद्द करण्यात आली, मात्र शिक्षक वार्षिक निकाल पत्रके तयार करण्यासंदर्भात स्वयंस्पष्ट सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या महाराष्ट्र मधील प्राथमिक शाळांमध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (सीसीई) पद्धतीने मूल्यमापन केले जाते, त्याअंतर्गत मूल्यमापनाचे ‘आकारिक मूल्यमापन’ व ‘संकलित मूल्यमापन’ अशा दोन प्रकारांमध्ये विभागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, चाचणी, सहअध्यायी मूल्यमापन, गृहपाठ, उपक्रम, प्रकल्प, पुस्तकासह चाचणी ( ओपन बुक टेस्ट) अशा विविध साधन तंत्रांचा वापर करून आकारिक मूल्यमापन पूर्ण केले जाते,
तर संकलित मूल्यमापन अंतर्गत पहिली-दुसरी साठी २०, तिसरी चौथी साठी ३०, चौथी -पाचवी साठी ४० व सहावी-सातवी साठी ६० मार्कांची लेखी चाचणी घेतली जाते.
अशा प्रकारचे ‘प्रथम सत्रातील’ 100 मार्कांचे मूल्यमापन पूर्ण झाले.
द्वितीय सत्रातील आकारिक मूल्यमापन पूर्ण झालेले होते, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून जवळपास पूर्ण झाले होते विद्यार्थी-शिक्षक द्वितीय सत्रातील ‘संकलित मूल्यमापन चाचणी’ ची तयारी करत होते, अशावेळी शाळा बंद ठेवण्यात आल्यामुळे वर्गनिहाय विविध मार्कांची संकलित चाचणी घेतली नाही ती रद्द करण्यात आली, परिणामी शिक्षकांच्या मनामध्ये निकाल पूर्ण करण्यासंदर्भात, विद्यार्थी नोंदवह्या पूर्ण करण्यासंदर्भात, तसेच विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तके तयार करण्यात साशंकता निर्माण झाली आहे, परिणामी शासनाच्या स्वयंस्पष्ट सूचनांच्या प्रतीक्षेत मध्ये शिक्षक आहेत. द्वितीयसत्रातील आकारिक मूल्यमापनावरून निकाल कसे बनवावे, संकलित चाचणीचे गुण नोंदवण्याच्या रकान्यात काय लिहावे, की कोरे सोडावे, एकूण शंभर मार्कांच्या मूल्यमापना पैकी किती मार्क देऊन विषयनिहाय श्रेण्या काढाव्यात? विद्यार्थ्यांचे शाळेतील कार्यदिवस व उपस्थित दिवस किती मानावेत
विद्यार्थी संचयी नोंद्पत्रक कसे पूर्ण करावे, त्यात श्रेण्या कोणत्या द्याव्यात, आकारिक मूल्यमापनाच्या गुणावरच श्रेण्या द्याव्यात, की त्यांचे रुपांतर एकूण गुणांपैकी करावेत?
अशा विविध संभ्रमात सध्या शिक्षक आहेत.
शाळा बंद असल्या तरी मुलांचे अनौपचारिक शिक्षण सुरू असल्याचे सर्वत्र दिसते. शासनामार्फत ‘दीक्षा’ मोबाईल ॲप वापरण्याबद्दल आवाहन करण्यात आले आहे.
काही शिक्षक स्वयंस्फूर्तीने विषय निहाय, घटक निहाय ऑनलाइन टेस्ट तयार करून विद्यार्थ्यांना ‘डिजिटली’ पाठवत आहेत, तर काही शिक्षक विविध विषयांवरील विद्यार्थ्यांचे स्वतःचे अनुभव लेखन, बहुपर्यायी प्रश्न मंजुषा, सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, ऑनलाइन आयोजित करून विद्यार्थ्यांचे ‘शिकणे’ चालू ठेवले आहे.
संसाधने उपलब्ध असलेल्या ठिकाणी स्काईप, झूम सारख्या कोलैबरेटीव अैप च्या माध्यमातून 'व्हर्च्युअल लर्निंग' अंतर्गत दररोज घटक निहाय ‘ट्युटरिंग’ करत 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत, काही शिक्षक व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाचा वापर करून मुलांना प्रश्नपत्रिका पाठवतात व ती सोडवण्यास सांगतात, मात्र हे ‘डिजिटल’ उपक्रम इंटरनेट सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी यशस्वी तर इंटरनेट अभावा मुळे काही ठिकाणी मर्यादा पडत असल्याचे दिसते. काही शिक्षक युट्युब वरील उपलब्ध व्हिडीओ तसेच प्लेस्टोर वरील विविध मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करून ‘लर्न फ्रॉम होम’ करण्याचा आग्रह विद्यार्थ्यांकडे धरत आहेत. काही जिल्हापरिषदांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करून विद्यार्थ्यांच्या ‘अध्ययन निष्पत्ती’ वर आधारित दिवस निहाय,विषय निहाय उपक्रम घेण्यास सांगितले आहेत.
लॉकडाऊनच्या काळामध्ये मात्र काही पालक आपल्या मुलांना छंद जोपासण्याचा आग्रह धरताना दिसतात. चित्रे, रांगोळी काढणे व मातीच्या वस्तू बनवणे, कागदा पासून विविध शोभिवंत वस्तू बनवणे, शोभेच्या व कलाकुसरीच्या वस्तू बनवणे, पाककला शिकणे, योगासने शिकणे, तबला-हार्मोनियम शिकणे, शिवण काम शिकणे, संगणकाचे विविध कौशल्य आत्मसात करणे, ग्रामीण भागातील मुले शेतांमध्ये काम करणे, पोहणे, गाईगुरांची काळजी घेणे, आजी आजोबांकडून गोष्टी ऐकणे, शाळा बंद असल्या तरी बच्चेकंपनी विविध उपक्रमातून नवनिर्मितीचा आनंद घेत आहेत. दुर्दैवाने परजिल्ह्यातील तथा परराज्यातील स्थलांतरित पालकांचे विद्यार्थी मात्र शासकिय निवारा ग्रहांमध्ये असल्याचे चित्र आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत प्राथमिक शाळांमधील काही शिक्षकांना गाव,तालुका, जिल्हा स्तरावरील चेक पोस्टवर पोलिसांसोबत तात्पुरत्या नेमणुका दिल्या आहेत, काही शिक्षक गाव-शहर स्तरावर घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींची माहिती गोळा करत आहेत, सर्वे करत आहेत, काही शिक्षक होमक्वारंटाईन चे शिक्के मारत आहेत.
शासनामार्फत मुलांचे शिकणे चालू ठेवण्यासाठी नुकतेच मंत्रालय स्तरावर सर्व अधिकारी, विषयतज्ञ काही निवडक शिक्षकांची ‘व्हर्च्युअल मिटिंग’ झाल्याचे कळते. विद्यार्थ्यांचे शिकणे लॉकडाऊन न होण्यासाठी शिक्षण विभाग जबाबदारीने काम करते आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, पुणे यांच्यामार्फत ऑडिओ, व्हिडिओ, पीडीएफ अशा ई-साहित्याच्या संकलनाचे काम सुरू केले आहे ते एकाच प्लॅटफॉर्मवर संकलित करून टी व्ही. चानल वर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ‘दीक्षा’ ई-साहित्य पोर्टल वरील वर्गनिहाय घटक निहाय ‘ई-साहित्यांची लिंक’ दररोज मुलांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दरवर्षी महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जातो. यावर्षी कोरोनाचे सावट व लॉकडाऊन मुळे संकलित मूल्यमापन कसे पूर्ण करावे व निकाल पत्रके कशी बनवावीत याबाबत मात्र शिक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, यासाठी शिक्षक शासनाच्या स्वयंस्पष्ट सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत.
@नागनाथ विभूते पुणे.
Tags
News