माझे संविधान माझा अभिमान उपक्रम अंतर्गत नमुना कविता दिलेल्या असून सोबत कवींची नावे दिलेली आहेत. तुम्ही याप्रमाणे तुमची स्वरचित कविता तयार करू शकता.
भारतीय संविधान कविता (नमुना) | नमुना कविता | Bhartiy Sanvidhan Kavita | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
भारतीय संविधान कविता- 1
स्वतंत्र भारताला मिळाला
संविधानरुपी मोलाचा ठेवा,
लोकशाहीचा राज्यकारभार
मार्गदर्शक तत्वानुरुप व्हावा...!
अहोरात्र कष्टले बाबासाहेब
बनले घटनेचे खरे शिल्पकार ,
सहकार्यांच्या मदतीने झाले
संविधान हे सत्यात साकार...!
समता बंधूता न्याय समानता
लोकहिताचा सर्वस्वी विचार ,
समानता नि स्वातंत्र्य मिळता
अभिव्यक्तीलाही मुक्त संचार...!
परदेशी राज्यघटना अभ्यासून
देशहिताची तत्वे अंगिकारली,
२६नोव्हेंबर १९४९ रोजी ही
संविधानरुपी घटना स्विकारली...!
२६जानेवारी १९५० दिवशी
संविधानाचा अंमल हा झाला,
देशाकारभारा मिळाली दिशा
लोकशाही शब्दा अर्थ आला...!
संविधानाचे जाणूनी महत्त्व
संविधानाचा राखूया सन्मान,
लोकहितवादी लोकशाहीला
संविधानाचा असे अभिमान...!
- SMITA MURALI
$ads={1}
भारतीय संविधान कविता - 2
प्रिय असे आपले भारताचे संविधान
वैचारिक लेखनीचा लाभला बहुमान
आम्ही नागरीक भारताचे सार्वभौम महान
एकतेने सर्वधर्म नांदतात किती छान..!
स्वातंत्र्य, समानता, न्याय मूल्यांचे जतन
राष्ट्रीय एकात्मता,अखंडता संविधानाची शान
विश्वबंधुभाव जगात मिळतो भारताला सन्मान
शांतीची शिकवण देते भारताचे संविधान..!
आदर्श मूल्ये आपली संस्कृती जगी महान
जाती, धर्म, पंथ सारे तिरंगा ध्वजाचा सन्मान
वैरभाव कधी ना घडो राष्ट्रीय संपत्तीचे जतन
ऐतिहासिक वास्तुनचे व्हावे राष्ट्र संवर्धन..!
विचार अभिव्यक्तीने घडले आपले जीवन
अर्थ आला जगण्याला, बहुमोल संविधान
नित्य आपल्या ध्यानी असावे संविधान
नित्य नेमाने स्मरावेआपले संविधान..!
प्रत्येकाच्या रक्तात दिसतो भारतीय अभिमान
नसानसात प्रत्येकाच्या भिनावा राष्ट्रप्रेमाचा प्राण
जाती, धर्म वादाला इथे नसावे कधी स्थान
मानवाने, मानवाचा राखावा बहुमान..!
-SANJAY RAGHUNATH SONAWANE
$ads={2}
शासन परिपत्रक काय आहे?
भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.
Tags
भारतीय संविधान