14 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे पंडीत जवाहरलाल नेहरुंची जयंतीदिन अर्थात त्यांचा वाढदिवस हा बालकांविषयी वाटणार्या प्रेमाची आठवण म्हणून संपूर्ण देशात 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते. नेहरुंना मुलं आत्मीयतेनं 'चाचा नेहरु' असे संबोधत. मुलं ही देशाची खरी संपत्ती असून देशविकासाचं मूळ बळकट होण्यासाठी त्यांनी बालकल्याणच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यात योग्य मूल्यांची व संस्कारांची रुजवून करण्यासाठी पालकांबरोबर शिक्षकांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत, याबाबत ते आग्रही असत. "मुलं म्हणजे फुलं" हे वाक्य त्यांच्या विचारसरणीचा एक भाग बनला होता.
" लहान मूल म्हणजे मातीचा गोळा
आकार द्यावा तशी मूर्ती घडते."
बालपण हे नेहमीच आपल्याला हवंहवंसं वाटत असतं. कारण बालपणात वावरताना मिळणारा आनंद हा गगनातही मावत नसतो. बालकांना हा आनंद मिळवण्याचा,मौजमस्ती करण्याचा हक्क आहे. या आनंदात त्यांचे भावविश्व गुरफटलेले असते.त्यामुळे लहानपणीच यांना योग्य संस्काराचेदेखील बीजारोपण करणे गरजेचे असते. कारण देशाचे भावी तडफदार नेतृत्व, देशरक्षणाचं मजबूत कवच, अन्यायाला वाचा फोडणारे बळ हे प्रत्येक बालकाच्या नसानसांत सळसळणारे रक्त हे फक्त योग्य संस्कारानेच भिनत असते. बालकांचे लहानपणातील भावविश्व मात्र प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. कारण हल्ली बालकांचे लहानपणच हरवत चाललंय ... ज्या वयात बालकांच्या हालचाली व कृतीतून त्यांचा भविष्याचा कल मोजायचा असतो, त्या वयातच त्यांच्यावर आपण दडपण, धाक, ताणतणावासारख्या व्हायरसचा मारा करत असतो. त्यात जो टिकला तो टिकला, नाहीतर शेवटी समुपदेशनसारख्या अँटीव्हायरसचा देखील काहीवेळा काहीच उपयोग होत नाही. कारण त्यांच्या विचारांचं मदरबोर्ड निकामी झालेलं असतं. बालकांच्या बालपणाचाच आपण इथे जीवंतपणीच खूण करतोय. मग त्यांच्या बालपणाच्या विचारांचं जग कसं फुलेल? अभ्यास, ट्युशनच्या भडिमारापुढे त्यांच्या विचारांचे वादळ शमलेलं असतं.
मूल जरा कुठे खेळायला गेलं तरी आपण त्याच्यावर रागावतो, ओरडतो. निसर्गरम्य वातावरणात रममाण व्हायला, गुजगोष्टी करायला, नवीन गोष्टी शिकायला त्यांनाही आवडत असेल ना..! आपण नेहमी म्हणत असतो की, "लहानपण देगा देवा".. कारण लहान असताना मिळणारे सर्वांचे प्रेम, होणारे लाड पाहून आपण तृप्त होत असतो. पण या लहान मुलांच्या लहानपणाचा आपण त्यांच्या कुवतीबाहेरील गोष्टी साध्य करण्यासाठी आयोग्य असा खेळखंडोबा करत असतो. त्यांना असं जोखडून ठेवणे म्हणजे त्यांच्या मानसिक व शरीरस्वास्थ्याची आपण वाट लावत असतो. अशा मुलांना मोठेपणी मानसिक व शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी मुलांना त्यांच्या कलेनं शिकू दिलं पाहिजे. त्याचं बालपण हेच म्हणत असेल,
" धाक, दडपण, ताणतणावाचं
वारं सारं थांबू द्या...
हरवलेल्या बालपणात
मोकळा श्वास घेऊ द्या..
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आनंदाचे क्षण मोजू द्या..
जीवन जगण्याचा खरा अर्थ
आम्हालाच शोधू द्या.."
मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक घडविण्यासाठी, भावी सुशिक्षित नागरिक घडविण्यासाठी बालकांना जीवन जगण्याचा अर्थ, आयुष्याचा खरा आनंद त्यांनाच शोधायला लावणे गरजेचे आहे. त्यांच्या या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याची जाणीव निर्माण केली पाहिजे. ही जाणीव प्रत्येक पालकाने मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजुतदार बनतीलच शिवाय कायमच वंचित व नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या ह्या प्रयत्नामुळे चांगले आयुष्य लाभेल व त्याच्याही आयुष्याचे नंदनवन होईल.
बालदिन साजरा करताना आपल्याला पंडित नेहरूंच्या विचारांचे जग आठवणे गरजेचे आहे. मुलामुलींना सुरक्षित व प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. त्यांना त्यांचे आयुष्य फुलविण्यासाठी समाजहितासाठी व देशहितासाठी समान संधी उपलब्ध करणे आवश्यक आहे.
मुलं जसजशी मोठी होत असतात, तसा त्यांच्या वर्तनात शारीरिक व मानसिक बदलही होत असतात. अशावेळी मुलांना परकेपणाची वागणूक न देता पालकांनी मुलांशी नेहमी मित्रत्वाचे नाते जोडले पाहिजे. त्यांच्या प्रत्येक शंकांचे निरसन केले पाहिजे. आपल्या पाल्यांचे समुपदेशन आपणच केल्यास प्रत्येक बालक योग्य मार्गाने आयुष्याचे वळण पार करत यशस्वी होईल व इतरांचे मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या आवडीतच आपले करिअर घडवेल.
लहान बालकांच्या सहवासात मिळणारा आनंद खुपच मोठा असतो. घरात एखादं लहान मुल असेल तर घराला घरपण येत असतं. शाळेमध्ये बालकांमध्ये बागडताना मी देखील माझे बालपण शोधत असतो. मुलांच्या प्रत्येक कृतीत, त्यांच्या प्रत्येक हास्यात आनंदाचे क्षण मोजत असतो. या सुखद क्षणांची शिदोरीच आपले समाधान व जीवन जगण्याची खरी गुरुकिल्ली असते.
प्रविण डाकरे
प्राथ. शिक्षक वेंगरुळ ता.भुदरगड जि.कोल्हापूर
जागतिक पातळीवर बालदिन हा दरवर्षी 20 नोव्हेंबर ला साजरा करतात. कारण या दिवशी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने "बालहक्कांची सनद" स्विकारली होती. जागतिक बालदिन चा मुख्य उद्देश सर्व देशांनी लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदानप्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढवावे तसेच जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना मान्य करून त्यादृष्टीने काम करावे, हा हेतू होता.
Tags
baldin