महिला स्वसंरक्षण : सन्मानाचा मार्ग | व्याख्याने व परिसंवाद | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत |
सध्याच्या परिस्थितीत महिला वर्गाचं बाहेर पडणं खूप धोक्याचं ठरतंय. महिलांच्या सुरक्षेसाठी स्पेशल अॅप, हेल्पलाईन नंबर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत पण तरीही आजही महिला सुरक्षित नाहीत, असं का? असा प्रश्न सर्वांना नेहमीच पडत असतो. तर याला कारणीभूत कुठेतरी आपणही आहोत. भर बाजारात किंवा अन्य ठिकाणी एखाद्या महिलेशी छेडछाड होते आणि आपण बघत बसतो. पण अशा वेळी जर आपण त्यांच्या मदतीला धावून गेलो तर कोणत्याही महिलेला एकटं बाहेर पडण्याची भीती वाटणार नाही. सद्यस्थितीत काही महिलांना बाहेरच्या जगापेक्षा घरात जास्त असुरक्षितता वाटते. अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. स्त्रियांचा आदर केला पाहिजे. कारण ती कुणाची तरी आई असते तर ती कुणाची तरी बहीण असते. स्त्री ही जगत जननी आहे, असा विचार जर सर्वांनी केला तर कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज महिलांना भासणार नाही.
भारतीय समाजव्यवस्थेचा स्त्री हा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना स्वातंत्र्याचा, सुरक्षिततेचा हक्क दिलेले आहेत. परंतु याच हक्कांची सध्या मोठ्या प्रमाणावर गळचेपी होत आहे. स्त्रियांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. महिलांची छेड काढणं, अश्लील चाळे करणं असे प्रकार शहरात, गावात सर्रासपणे घडत आहेत. या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे ती पुरुषी मानसिकता. महिलांना त्रास देणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या या पुरुषांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. सरकारी यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर स्त्री सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याबाबतची माहिती स्त्रियांपर्यंत पोहोचवण्यात या यंत्रणा कमी पडते. स्त्रियांसाठी सुरू केलेल्या आपात्कालीन क्रमांक, महिला सुरक्षा गस्ती पथकांबाबत अनेक महिला अनभिज्ञ आहेत. यासाठी कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे.
महिलांची सुरक्षा या प्रश्नाला दिवसेंदिवस व्यापक रूप प्राप्त होतंय. चालताना, बसमध्ये, ट्रेनमध्ये कुणीही यावं आणि स्पर्श करून जावं हेच घडताना दिसतंय. माझ्या मते, कायद्याने महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाय शोधले, नवीन उपक्रम सुरू केले आहेत. आता गरज आहे, ती गुन्हा घडल्यानंतर दिल्या जाणाऱ्या शिक्षेची. एखाद्या स्त्रीचा विनयभंग हा प्रकार साधासुधा नसून तो एक गंभीर अपराध आहे. यासाठी कायद्यात काही कठोर बदल होणं अपेक्षित आहे. त्यामुळे गुन्हेगाराला सक्तीचा तुरुंगवास करायला हवा. त्यांना परिणामांची जाणीव करून द्यायला हवी. तरच, निदान कायद्याला घाबरून का होईना, पण हे प्रकार आटोक्यात येतील. एखाद्या स्त्रीचा विनयभंग होत असताना फक्त बघत न बसता तिच्या मदतीला धावून जायला हवं.
घरात जसं तिला सुरक्षित वातावरण मिळतं तसंच वातावरण तिला बाहेर आपल्या समाजात मिळतं का? आज महिलांच्या बाबतीत होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाणही वाढत आहे. पोलीसदेखील याबाबतीत सजग राहून यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी सक्षम आहेत. तसंच महिला सुरक्षेसाठी अनेक कायदे, यंत्रणा, अॅप बनवले आहेत. तरीही महिला सुरक्षित आहेत का? हा एक प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो. महिलांवर होणारे अनेक अत्याचाराचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक मुलीने पुढाकार घेतला पाहिजे. आता महिलांनीच स्वसंरक्षणासाठी सज्ज झालं पाहिजे. प्रत्येक मुलीला तिच्या स्वतःचं संरक्षण करण्याची जाण असली पाहिजे. जेणेकरून त्यांच्यावर अतिप्रसंग ओढवण्याआधीच ते टाळले जातील.
सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत तरीही त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, हे वास्तव अत्यंत संतापजनक आहे. आजपर्यंत सर्वच थरांत महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर फक्त चर्चा होताना दिसते, मात्र ठोस पावलं उचलली जात नाहीत. महिला असुरक्षित असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुरुषी मानसिकता. आज कित्येक महिलांना, मुलींना रोज याच मानसिकतेचा सामना करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी महिलांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद करून एकत्रित यायला हवं. पोलीस, रुग्णालय व इतर प्रशासनाकडून पीडितांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे सुरक्षिततेसाठी कठोर पाऊलं उचलण्याची गरज आहे, असं मला वाटतं. तसंच महिलांनी एकत्र येऊन अत्याचार कमी करण्यासाठी पुरुषी भान जागं करण्याची आवश्यकता आहे.
आज भारत एकविसाव्या शतकात पदार्पण करत प्रगतीपथावर आहे. पण आजही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची बातम्यांची संख्या कमी होत नाही. आजही भारतात स्त्रियांवर विनयभंग, घरगुती हिंसा, हुंडाबळी यासारख्या घटना होतात. तसंच सरकारने महिला सुरक्षेसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने स्त्रियांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस दल निर्माण केलं, त्यांना आपात्कालीन नंबर देण्यात आला तसंच विविध अॅप तयार केलं. पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. स्त्रियांच्या संरक्षणासाठी प्रथम स्त्रियांनी सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्त्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. तसंच स्त्रियांवरील अत्याचाराविरूद्ध कडक कायदे निर्माण करणं गरजेचं आहे.
शाळकरी मुलींवर बलात्कार, कधी तरुणींची छेड तर कधी महिलेचा विनयभंग या घटना घडतात. यासाठी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. तरुण वर्गाने पुढाकार घेऊन गावातील, खेड्यापाड्यातील स्त्रियांना साक्षर केलं पाहिजे. तरच त्यांना त्यांच्या हक्कांची, अधिकारांची जाणीव होईल. सरकारने अनेक योजना राबवल्या, पण त्या स्त्रियांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. तसंच अशा गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी तरच पीडितेला योग्य न्याय मिळेल. पण आपली न्यायव्यवस्था स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यात सक्षम आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या देशातील स्त्रियांच्या असुरक्षेसाठी पुरोगामी विचारसरणी, वाईट प्रवृती, कायद्यातील असक्षमता कारणीभूत आहे. म्हणूनच स्त्रियांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची पथके प्रत्येक रेल्वेस्थानकाजवळ, चौपाटीजवळ, शाळेजवळ तसेच महाविद्यालयांजवळ रुजू केले पाहिजे. शाळकरी मुली, तरुणी, महिलांना शाळेत, कामाच्या ठिकाणी स्वयंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत.
सरकारने काही कठोर शिक्षा अमलात आणाव्यात जेणेकरुन वाईट प्रवृत्ती स्त्रियांपासून दूर राहिल्या पाहिजेत. तसंच अशा वाईट प्रसंगातून सावध होऊन स्त्रिया सक्षम होऊन अशा गलिच्छ विकृतींविरोधात लढत आहेत. या त्यांच्या क्षमतेला अनेक गोष्टींची जोड मिळते तरीही गुन्हेगाराला कठोर शिक्षा सुनावली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आणखीन सुरक्षित वाटेल. या सगळ्यासाठी नुसतं विचार करुन उपयोग नाही तर त्यापलीकडे अमल हवा.
महिलांची सुरक्षा हा सध्याचा चर्चेतला विषय आहे. या विषयावर आपण दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा. पहिली म्हणजे आपण आपल्या मुलांना दिलेली शिकवण किंवा संस्कार यांच्यामध्ये काही कमी पडत नाही ना? जर कमी पडत असलो तर आपण त्याच्यावर विचार करायलाच हवा. आता प्रश्न आला महिलांच्या सुरक्षेचा. माझं असं स्प्ष्ट मत आहे की, त्यांना स्वतःचं संरक्षण करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. सरकारने कितीही योजना राबवू द्या. जर महिलांना आत्मसंरक्षणाचं ज्ञान आजच्या घडीला असायलाच हवं. महिलांना आत्मसंरक्षण शिकवणं ही आजच्या काळाची गरज आहे. सरकारने यासाठी काही कडक पाऊल उचलून योजना राबवल्या पाहिजेत. असं झालं तर येत्या काळात या घटना जवळपास नाहीशा होतील.
आपण आज एकविसाव्या शतकात वावरतो. कला, विज्ञान, तंत्रज्ञान यांसारख्या अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली. तरीही आपल्या देशात महिला सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो? महिलांची छेडछाड, विनायभंग, लैंगिक छळ यांसारख्या घटना नेहमी होताना दिसतात. याला जबाबदार कोण? महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाय योजना राबवल्या आहेत. कायदे सुव्यवस्था यामध्ये महिलांसाठी अनेक तरतुदी आहेत, पण माहितीच्या अभावामुळे त्यांचा योग्य वापर होताना दिसत नाही. या सर्वांवर उपाय म्हणजे समाजाची मानसिकता बदलणं. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सर्व महिलांनी एकजूटीने पुढे येणं गरजेचं आहे. तसंच पालकांनीही आपल्या मुलांच्या मनात स्त्रियांविषयी आदरभाव निर्माण करणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे महिला सुरक्षितेसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
आपल्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांनी खूप नाव आणि यश मिळवलंय यात काही शंकाच नाही. पण अजून वास्तव हेच आहे की, आपल्या देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. दरवेळी आपण आपल्या व्यवस्थेलाच दोषी ठरवून मोकळे होतो, पण असं चालणार नाही. प्रत्येकांनी आपलं कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीला आपण सन्मानाने वागवलंच पाहिजे. तर आणि तरच स्त्रिया सुरक्षितपणे आणि निर्भयपणे घराबाहेर पडू शकतील. तर मित्रांनो आता वेळ आहे, आपल्याला आणि आपली विचारसरणीला बदलण्याची.
महिला स्वसंरक्षण : सन्मानाचा मार्ग | व्याख्याने व परिसंवाद | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
इतर निबंध व भाषणे -
२) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
४) सुजाण पालकत्व - इथे क्लिक करा
५) मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण-इथे क्लिक करा
६) प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा -इथे क्लिक करा
७) लिंग समानता जोपासणारा समाज-इथे क्लिक करा
आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला Join व्हा. ग्रुप सेटिंग Only Admin असेल.
जिल्हानिहाय व्हॉट्सअप ग्रुप - इथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुपला समाविष्ट व्हा - https://t.me/+STR7BmsY5ErbaVSV
Tags
बालिका दिन