प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा निबंध | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी उद्धृत केलेल्या ओळी म्हणजे मातृत्वाच्या महन्मंगल अविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुनाच! युगपुरुष शिवराय घडले, वाढले आणि 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमत योगी।' असे ज्यांचे वर्णन केले जाते, ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! राजमाता जिजाऊसाहेबांनी शिवनेरीच्या अंगाखांदयावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला, शिकविताना शिवरायांना महाभारत आणि रामायणातील 'राम आणि कृष्णांच्या' गोष्टींचे बोधामृत पाजताना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले. 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे' त्या मूलमंत्राचा उतरविला, ती मातृत्वशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ.
शहाजी महाराजांनी जिजामातेवर पुण्याची जबाबदारी सोपवल्याने त्या शिवाजी महाराजांसमवेत पुणे येथे आल्या. शत्रुचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती परंतु दादोजी कोंडदेवांच्या मदतीने त्यांनी पुण्याची जवाबदारी समर्थपणे पेलली.पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतक.यांना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदा.या पार पाडतांना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत.
शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योध्यांच्या गोष्टी सांगणे, राम कृष्णाच्या, बलाढय आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर संस्कार करीत होत्या व शस्त्रविद्येत त्यांना निपुण करतांना दादोजी कोंडदेवांसोबत स्वतःदेखील बारकाईने लक्ष ठेवत होत्या. शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणा.याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले.मोठया मोहिमांवर जेव्हा शिवराय जात तेव्हां राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत. शहाजी राजे बंगळुर येथे चाकरीवर असतांना त्या शिवाजी महाराजांच्या आई वडिल दोन्ही ही झाल्या. नेटाने आणि धैर्याने राज्यकारभार सांभाळला. सईबाईंच्या अकाली जाण्याने संभाजीराजांची जवाबदारी सुध्दा समर्थपण पेलली.
राजांच्या लढायांचा, युध्दांचा, स्वा.यांचा सर्व तपशील स्वतः ठेवायच्या. महाराजांच्या मुत्सद्देगिरीत, खलबतांमधे स्वतः जातीने लक्ष घालायच्या. वेळप्रसंगी योग्य सल्ला द्यायच्या.शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हां कैद झाली होती त्यावेळी उतारवयात देखील जिजाऊ माॅं साहेबांनी राज्याची जवाबदारी अतिशय समर्थपणे पेलली.
आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजा देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले.
स्त्री अबला नसून सबला आहे, हे आज कर्तृत्ववान स्त्रियांनी सिद्ध केले आहे. पोस्टमनपासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. सर्वांनाच अभिमान वाटावा, असेच स्त्रीचे कर्तृत्व आहे. या साऱ्याचे श्रेय अर्थातच सावित्रीबाई फुले यांना आहे. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे.अशा काळात फुले दाम्पत्याने क्रांतिकारक कार्य केले. आपल्या पतीच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सावित्रीबाई! मुलींसाठी शाळा काढून मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या सावित्रीबाईंचा जन्मदिवस आपण 'बालिका दिन' म्हणून साजरा करतो.
सुमारे १८३१ साली नायगाव येथील खंडोजी पाटील यांच्या घरात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई लहानपणापासूनच चुणचुणीत, हुशार नि बंडखोर विचारांच्या होत्या. तो काळ मागासल्या विचारांचा होता. रूढी, प्रथा यांना महत्त्व दिले जात असे. बालविवाह सर्रास होत असत. चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र होते. अशा काळात जन्म झालेल्या सावित्रीबाईंना समंजस व शिक्षित पती मिळाला. त्यांच्या प्रेरणेने सावित्रीबाईंच्या जन्माचे सोने झाले.
सावित्रीबाई हुशार होत्या. त्यांना शिकण्याची आवड व इच्छा होती. ती इच्छा त्यांच्या पतीने म्हणजेच जोतीराव फुले यांनी पूर्ण केली. सावित्रीबाईंचे ते गुरू बनले. सावित्रीबाईदेखील उत्तम शिष्या बनल्या. त्या जिज्ञासेने व कुतूहलाने शिकत होत्या. काल शिकविलेले आज त्या धडाधडा म्हणून दाखवीत.
रोज नवीन काहीतरी शिकत. त्यांची प्रगती वाखाणण्यासाठी होती. हातात पुस्तक पडले, की लगेचच त्या ते वाचून काढत. वाचन, पाढे, बेरीज, वजाबाकी, हिशेब, इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान शिकत. त्यांचा शिक्षणाचा ध्यास व झपाटा विलक्षण होता.
लवकरच त्यांनी चौथीची परीक्षा दिली व त्यात उत्तम यश संपादन केले. 'जिच्या हाती विद्येची दोरी, ती जगाला उद्धारी' ही उक्ती त्यांनी खरी करून दाखवली. जोतीराव म्हणत असत “एक स्त्री शिकली की एक कुटुंब शिकते. अशी अनेक कुटुंबे शिकली, का समाज शिक्षित होतो. समाज शिक्षित झाला, की राष्ट्र शिक्षित होते.”
जोतीरावांनी चांगल्या कामाची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच केली. स्वत:च्या पत्नीला शिकवून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला. समाजानेदेखील या आदर्शाप्रमाणे पाऊल पुढे टाकावे, अशी त्यांची इच्छा होती.
१८४८ साली भिडे वाड्यात त्यांनी पतीच्या प्रेरणेने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होण्याचा पहिला मान त्यांना मिळाला. सुरुवातीला मुलींची संख्या कमी होती. प्रवाहाच्या दिशेने पोहणारे सगळेच असतात; पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासाठी धैर्य लागते. हळूहळू हे धैर्य वाढू लागले.
मुलींची संख्या वाढू लागली. सनातनी लोकांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली. 'कलियुग आले, धर्म बुडाला,' अशी टीका होऊ लागली. तरीही हे सारे शांतपणे सहन करीत त्या आपले कार्य नेटाने पुढे नेत असत.
विघ्नसंतोषी माणसे त्यांना खूप त्रास देत; पण तो त्रास सहन करीत त्या प्रत्युत्तरादाखल म्हणत, “हे पवित्र कार्य मी सतत करावे म्हणून तुम्ही शेण, खडे मारत नसून माझ्यावर फुलेच उधळीत आहात, असेच मला वाटते.' सावित्रीबाईंची जिद्द, चिकाटी, धाडस पाहून जोतीरावांना आनंद होत असे. त्यांची स्त्री-शिक्षणाची इच्छा पत्नीकडून पूर्ण होत आहे, हे पाहून त्यांना समाधान वाटत असे.
त्या काळातील महिला रूढी-परंपरा यांच्या गुलामगिरीत जखडल्या होत्या. त्यांची या गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा त्यांनी चंगच बांधला. प्रयत्नांची शिकस्त केली. महिलांच्या विकासासाठी त्यांनी महिला सेवा मंडळा'ची स्थापना केली. केशवपनाविरुद्ध बंड केले. नाभिकांचा संप घडवून आणला. 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू करून त्यांनी अडल्या-नडल्या आणि वाट चुकलेल्या विधवांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले. दुष्काळ, प्लेग या साथीच्या काळात रंजल्या-गांजल्यांची सेवा केली आणि अन्नछत्रे चालविली.
अशा प्रकारे सावित्रीबाई क्रांतिज्योत बनल्या. स्त्री-जीवनात क्रांती घडविणाऱ्या, ज्ञानज्योत प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई समाजापुढे आदर्श होत्या. स्वतः शिकून स्त्रीपुरुष समानतेचा पाया घालणाऱ्या, दलित बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी झटणाऱ्या क्रांतिज्योतीला शतश: प्रणाम!
प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा निबंध | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
इतर निबंध व भाषणे -
२) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
४) सुजाण पालकत्व - इथे क्लिक करा
५) मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण-इथे क्लिक करा
६) प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा -इथे क्लिक करा
७) लिंग समानता जोपासणारा समाज-इथे क्लिक करा
आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला Join व्हा. ग्रुप सेटिंग Only Admin असेल.
जिल्हानिहाय व्हॉट्सअप ग्रुप - इथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुपला समाविष्ट व्हा - https://t.me/+STR7BmsY5ErbaVSV
Tags
बालिका दिन