आनंदमयी आणि आरोग्यदायी शाळा | व्याख्याने व परिसंवाद | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
शिकवावे कसे, हे शिकवणारी अनेक महाविद्यालये जगात आहेत. पण शिकावे कसे, हे मात्र जणू काही सर्वाना जन्मजात माहीत असते असे समजले जाते. नुकतेच जन्मलेले मूल दोनच वर्षांत चालायला, बोलायला लागते ते आपले आपण. कुणीही त्याला शिकवत नाही. त्याला व्याकरण न शिकवता नीट बोलता येते. त्याला वस्तू, माणसे, भावना ओळखता येतात. असे म्हणतात, की आयुष्यात आपण जे काही शिकतो, त्यातले ९० टक्क्यांपेक्षा जास्त पहिल्या दोन वर्षांत शिकतो. हे सारे कुणीही न शिकवता शिकणाऱ्या बाळाला पुढे आपण शिकवायला लागतो आणि त्याने अनिच्छा दाखवल्यास बदडायला लागतो. पहिल्या दोन वर्षांतले हे कौतुकभरले आपोआप झालेले शिक्षण अचानक अत्यंत दु:खद अशा शालेय शिक्षणात परिवर्तित होते. काय बरे होत असावे? ज्या गोष्टीमुळे आपले अज्ञान दूर होते, आपल्याला नवीन गोष्टी समजू लागतात, ती गोष्ट किती आनंददायक असायला हवी! पण ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ यावर विश्वास ठेवणारे काही कमी नाहीत. प्राणी आपल्या पिलांना शिकार करायला शिकवताना मारझोड करताना कुणी डिस्कव्हरी चॅनेलवर पाहिले असेल तर सांगावे. शिक्षणातील पहिले दु:ख असे हे शिकणे शक्य आहे, पण शिकवणे अशक्य आहे हेच कुणाला माहीत नाही.
एखादी गोष्ट शिकायचा ध्यास घेतला की एकलव्य फक्त पुतळ्याकडून सारी धनुर्वद्यिा शिकू शकतो आणि शिकायचे नसेल तर बाळ्या प्रत्यक्ष आइनस्टाइनकडून ‘बे दुणे चार’ हेदेखील शिकू शकत नाही. हा ध्यास उत्पन्न झाल्याशिवाय मुलांना शिकवणे हा अत्याचार आहे. त्यामुळेच शाळेत जाताना मुले आक्रोश करून रडत असतात. ही गोष्ट भयंकर आहे, हे त्यांना मनापासून समजलेले असते.
सम्राट अकबराला एकदा प्रश्न पडला की, जन्मलेल्या मुलाची भाषा कोणती असते? त्याने दरबारात तो प्रश्न मांडला. कुणीच योग्य उत्तर देऊ शकेना. मग त्याने एक प्रयोग केला. एका नुकत्याच जन्म झालेल्या बाळाला पूर्णपणे आवाज न येतील असे एक वर्ष वाढवले व अखेर ते मूल एक शब्दही उच्चारण्यास असमर्थ ठरले, कारण त्याच्याभोवतीचे वातावरण शिकण्यास अनुकूल नव्हते. सहज शिकण्यासाठी फक्त वातावरण अनुकूल लागते. मूल आपले आपण शिकते.
शिक्षण हे घडले पाहिजे. चालताना मूल पडले तर हसते, परत उठते, परत पडते, हसते असे करत करत चालायला लागते. अनेक मुले एकत्र आल्यावर एकमेकांचे बघून शिकत राहतात, किंबहुना हे बघून शिक्षकदेखील शिकत राहतात आणि एक आनंदमय असे वातावरण यासाठी कारणीभूत असते. मुलांकडून शिकत राहिले की, आपोआप शिकवले जाते.
आपल्याला काय आवडते, हे कळायला कित्येकांना फार वेळ लागतो, कारण अगदी लहानपणापासून कुणी विचारलेले नसते आणि तसा विचार करण्याएवढा पोच नसतो, पण आयुष्याच्या कोणत्याही वळणावर जर कळले तर त्या क्षणी शिकायला सुरुवात करणे हे जितके लवकर जमेल तितका आयुष्यातला आनंद वाढीस लागतो. शिकताना कुणाकडून आणि कसे शिकायचे हेही शिकायला लागते. ज्या माणसाशी बोलताना आनंद होतो, जो आपल्याला काय माहीत नाही याविषयी सहज बोलू शकतो, ज्याची विनोदबुद्धी जागृत आहे आणि ज्याला भेटून गेल्यावर एक शांतपणा येतो, त्याच्याकडून शिकणे योग्य. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या मनात एकाच वेळी पूर्ण विश्वास आणि पूर्ण अविश्वास लागतो. विश्वास अशासाठी की आपल्याला जे शिकायचे आहे ते याच्याकडे आहे हे माहीत आहे. अविश्वास अशासाठी की हा जे शिकवतो आहे त्याची प्रचीती आल्याखेरीज ते स्वीकारता येत नाही. प्रचीती न आल्यास प्रश्न विचारायलाच पाहिजेत. प्रश्न विचारू न दिल्यास शिक्षकाबद्दल परत विचार करावा.
जे शिकल्यावर आनंदाव्यतिरिक्त उपजीविका, सृजन, मदत, साक्षात्कार यापकी सारे किंवा काहीही आयुष्यात होते, तेव्हा आयुष्य भरून पावले असे म्हणता येते. उत्तम शिक्षकाकडे अहंकार नसतो, तसेच त्याच्याप्रमाणे त्याच्या विद्यार्थ्यांकडेही तो शिल्लक राहत नाही. कारण आपल्याला जे माहीत आहे त्यापेक्षा माहीत होण्यासारखे असे अफाट ज्ञान आहे, की जे या आयुष्यात कवटाळणे शक्य नाही हे त्या दोघांना समजलेले असते. पंचेंद्रियांमुळे जे ज्ञान होते, त्याही पल्याड काही आहे अशी जाणीव होणे हे शिक्षणाचे फलित असले पाहिजे.
आयुष्यभर शिकत राहणे यासारखी दुसरी मजेदार गोष्ट नाही. आपल्यापेक्षा लहान मुले कितीतरी जास्त छान गात असतात. वाजवत असतात. चित्रे काढत असतात. आपल्याला येत नाही, असे जेव्हा त्यांना समजते तेव्हा आपणहून शिकवतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखी दुसरी मजा नाही. इतके सोपे आणि सुंदर कुणीच शिकवू शकत नाही. शिकत राहण्यामुळे आयुष्यातील ऊर्जा वाढत राहते. वय वाढल्याची कोणतीच जाणीव तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. शिकण्याचा आनंद पूर्णपणे वैयक्तिक असल्यामुळे कुणाला त्रास होण्याची शक्यता नसते. वृत्ती अंतर्मुख झाल्यामुळे बाहय़ गोष्टींचा विनाकारण त्रास करून घेणे बंद होते. ऊर्जेचा संचय होत राहिल्यामुळे अनेकजणांना तुमच्याकडून आपोआप मदत होऊ लागते, त्यामुळे तुमचा मित्रपरिवार वाढता राहतो. तुम्ही क्षणाक्षणाला चकित होत असता. आयुष्यात सतत विस्मयजनक असेच काहीतरी चालू आहे, असे वाटत राहते आणि याहून आनंददायक अशी कोणती अवस्था असू शकत नाही.
शालेय आरोग्य सेवा हे सामाजिक आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. सामजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आरोग्य सेवा यांचे मार्फत शालेय वयोगटातील मुले आणि मुली यांच्या आरोग्याचे संवर्धन करण्यास मदत होते व शैक्षणिक काल आरोग्यदायी राखण्यास मदत होते.
शालेय आरोग्य कार्यक्रमात शाळेतील आरोग्य विषयक सर्व कार्यक्रम, आरोग्य शिक्षण, बरे होणाऱ्या व दुरुस्त करता येणाऱ्या आरोग्य समस्यांचे निराकरण करणे. आरोग्याच्या चांगल्या सवयी लावणे उदा., स्वतःची व परिसराची स्वच्छता, योग्य तो आहार, व्यायाम, मनोरंजनाच्या चांगल्या सवयी, ज्या योगे उद्याचा एक सुजाण नागरिक बनण्यास मदत होईल अशा बाबींचा समावेश होतो.
शालेय आरोग्य सेवांचे महत्त्व : प्रामुख्याने शालेय आरोग्य सेवा देण्यामागची कारणे खालील प्रमाणे लक्षात घेणे जरूरी आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या : एकूण लोकांखेच्या साधारणत: १५% एवढ्या प्रमाणात असते. भारतात शाळेत जाणाऱ्या ५ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांची संख्या मोठी आहे. त्यांच्यातील आरोग्य समस्यांचे नियोजन करणे जरुरी असते.
शालेय मुलांचा वाढ व विकासाचा कालावधी : या कालावधीत मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल मोठ्या प्रमाणात होत असतात. म्हणून त्यांना या काळात आरोग्य निरीक्षण आणि मार्गदर्शन याची नितांत गरज असते.
शालेय मुलांमधील रोगांचे लवकर निदान करणे : मुलांना कुपोषण व संसर्गजन्य आजार लवकर होऊ शकतात. त्यांचे शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमातून निदान करता येते.
शालेय मुलांना गटागटात राहणे आवडते : शालेय आरोग्य सेवेचे नियोजन करून त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेऊन मार्गदर्शन करता येते. गटात किंवा समूहात राहिल्यामुळे मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. शाळेत मुलांना झालेला संसर्ग साहजिकच कुटुंब आणि समाजात ही कालांतराने पसरतो.
शालेय वयोगटातील मुलांना नियंत्रणात ठेवण्याची अधिक असते : हा गट शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करतो. एकेका वयोगटातील समूहात आरोग्य शिक्षण दिल्यास ते स्वीकारतात.
शैक्षणिक संधी : मुलांचे दृष्टीकोन व सवयी आरोग्यपूर्ण बनविण्यासाठी व आरोग्य शिक्षण देण्यासाठी शाळा ही योग्य जागा ठरते.
शालेय आरोग्य परिचर्येची उद्दिष्टे:
आरोग्य शिक्षण, आरोग्य सेवा व पोषण कार्यक्रमाद्वारे शाळेतील मुलांच्या वाढ आणि विकासात हातभार लावणे.
सांसर्गिक आजारांचे शाळेतील मुलांमध्ये नियंत्रण आणि प्रतिबंधन करणे.
आरोग्यपूर्ण शालेय जीवन निर्माण करून विद्यार्थ्यांचा आरोग्यविषयक दृष्टीकोन सकारात्मक बनविणे.
शालेय आरोग्य कार्यक्रमात सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका : परिचारिकेला असलेले ज्ञान, विषयावरील पकड तसेच नेतृत्वगुण यावरच शालेय आरोग्य कार्यक्रमाचे यश सर्वस्वी अवलंबून असते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना मुलांचे मानसशास्र, समाजशास्र आणि आरोग्य शिक्षण इ. विषयी पुरेसे ज्ञान असणे जरूरीचे असते.
शाळा, घर व समाज यातील आरोग्याचा दुवा म्हणून कार्य करणे. शाळेतील व मुलांच्या घरातील वागणूक व वातावरण यातील फरक जाणून ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न करणे.
शालेय आरोग्य कार्यक्रमाचे नियाजन करणे, संघटक व समन्वयक म्हणून काम करणे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वेळापत्रक शिक्षकांसमवेत तयार करणे. त्या विषयी पालकांना कळविणे.
पालक –शिक्षक सभांचे आयोजन करणे. गृहभेटीद्वारे तशी माहिती पुरविणे आणि महत्त्व समजावून सांगणे.
आरोग्य शिक्षक हे समन्वयक आणि आरोग्यदायी जीवनाचे मार्गदर्शक म्हणून कर्तव्य पार पाडतात. आरोग्य विषयक व्याख्यानांसाठी विषयाची निवड करून पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करतात.
शालेय आरोग्य कार्यक्रमात सामाजिक आरोग्य परिचारिकेची कार्ये :
१. विद्यार्थ्यांच्या आरोग्य स्थितीचे निरीक्षण व निदान :
वैद्यकीय अधिकारी येण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक नोंदी पूर्ण झाल्या आहेत याची खात्री करते.
प्राथमिक आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांचे वजन, उंची, दंडाचा घेर (गरजेनुसार) मोजमाप करून अधिक तपासणीसाठी आवश्यकतेनुसार तज्ञ डॉक्टरांकडे पाठविते.
शालेय आरोग्य परिचारिका, अनैसर्गिकपणे घामाघूम झालेला चेहरा, अंगावरती फोड किंवा डाग, सर्दीची लक्षणे, खोकला किंवा शिंका, घसा बसणे, मळमळ, उलट्या व जुलाब होणे, डोळे लाल होणे वा डोळ्यातून पाणी येणे, ताप येणे, हुडहुडी भरणे, अंग दुखणे, डोके दुखी, निस्तेज चेहरा, गुंगी वा झोप येणे, खेळात भाग न घेणे, खरुज किंवा रिंग वर्म सारखे त्वचेचे आजार, डोक्यावरील केसात उवा किंवा लिखा, पोटात होणारा कृमींचा किंवा जंत प्रादुर्भाव अशी निरीक्षणे करून मुलांना तज्ञ डॉक्टरांकडे पाठविते.
यानंतर आवश्यकतेनुसार पालकांना आजार किंवा निदान विषयी माहिती कळविते व पुढील संदर्भ सेवेसाठी लेखी नोंदी देते.
२. उपचार, पाठपुरावा आणि संदर्भ सेवा यांसाठी परिचारिकेची भूमिका :
शालेय आरोग्य तपासणी हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्त्वाचे कार्य असते.
शालेय मुलांच्या आरोग्य तपासणी पश्चात त्यांच्यात दिसून येणाऱ्या आरोग्य समस्यांप्रमाणे त्यांना पुढील उपचारांसाठी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय इ. ठिकाणी पाठवून संदर्भ सेवा देणे आणि पाठपुरावा करणे.
औषधोपचाराच्या जोडीला गरजेनुसार श्रवणयंत्र किंवा चष्मा यासारखी उपकरणे मिळविण्यासाठी समाज कल्याण योजनांची माहिती पुरविणे.
संदर्भ सेवा देण्यासाठी विविध रुग्णालयांची यादी तयार ठेवणे.
३. लसीकरण : आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शालेय वयोगटातील मुलांचे लसीकरण हा सार्वत्रिक लसीकरणाचा एक भाग आहे. ज्यात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा (Secondary Immunization) विचार केला जातो. उदा., डी टी (DT) – दुसरा बुस्ट्रर डोस, (Inj.TT), रुबेला व मम्स (Rubela& Mumms) इ. लसीकरणासाठी परिचारिका वेळापत्रकाप्रमाणे नियोजन करते.
४. शाळेतील स्वच्छता : यात विद्यार्थ्याची वैयक्तिक स्वच्छता आणि शाळेतील परिसर याचा समावेश केला जातो. त्याकरिता खालील निरीक्षणे व योजना आखताना आरोग्य समूहाची मदत होते.
त्यासाठी शाळेतील स्वच्छता आदर्श असावी.
सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा
स्वच्छता गृहे (मुले व मुलींसाठी स्वतंत्र सोय)
शालेय अधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त खाद्य विक्रेत्यांनाच खाद्यपदार्थ विकण्यास परवानगी असावी.
आरोग्यदायी पर्यावरणासाठी सोयी सुविधा असाव्यात ज्यायोगे मुलांचे भावनिक, सामाजिक व वैयक्तिक आरोग्याच्या सवयी जपण्यास मदत होईल.
५. पोषणाच्या सेवा : सामाजिक आरोग्य परिचारिका शाळेतील मुलांसाठी पुढील पूरक पोषण आहार कार्यक्रमाची अंमलबजावणी करु शकतात.
शाळेच्या मधल्या सुट्टीतील जेवण ( Midday School Meal ) ज्या मधून मुलांना संपूर्ण आहारापैकी १/३ इतकी प्रथिने आणि १/२ ऊर्जा (Calories) ही पोषण सत्त्वे मिळतात.
जीवनसत्त्व ‘अ’ पुरवठा कार्यक्रम – ६ वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुलांना दर ६ महिन्यांनी २,००,००० आंतरराष्ट्रीय एकक (International Unit) इतका जीवनसत्त्व ‘अ’चा डोस देणे. ज्यामुळे मुलांमधील दृष्टीदोष होण्याच्या समस्येवर प्रतिबंध करता येतो.
६. प्रथमोपचार : शाळेमध्ये प्रथमोपचाराची सर्व साधने आणि औषधे असलेली पेटी सहजगत्या उपलब्ध करण्यासाठी परिचारिका मदत करतात. त्यामुळे शाळेत उद्भवणाऱ्या किरकोळ अपघात, दुखापत,जखमा, पोटात दुखणे, चक्कर येणे, झटके येणे, नाकाचा घोळणा फुटून रक्त स्राव होणे इत्यादी आरोग्य समस्यांवर प्रथमोपचार करता येतो.
७. आरोग्य शिक्षण : वैयक्तिक व सामाजिक आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी आरोग्य शिक्षण हे महत्त्वाचे साधन असते. ह्या शिक्षणाचा उद्देश म्हणजे “मुलांच्या आरोग्य विषयक दृष्टीकोन, ज्ञान व आरोग्याचया सवयी यांत सुयोग्य बदल करणे हा असतो.” त्यांचा या कार्यक्रमात सहभाग वाढविण्यासाठी परिचारिका त्यांना शालेय आरोग्य प्रशिक्षणातून प्रेरणा देते. प्रशिक्षणाचे विषय पुढील प्रमाणे असू शकतात.
शारीरिक स्वच्छता
त्वचा, केस, दात, कपडे यांची स्वच्छता
चांगल्या सवयी
झोप, व्यायाम, आहार यांचे महत्त्व
माशा व इतर कीटकांचे नियंत्रण
शाळेच्या परिसराची स्वच्छता
वर्गातील स्वच्छता
८. शालेय आरोग्य नोंदी : या बाबतीत परिचारिका खालील नोंदी ठेवतात :
विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती – नाव, जन्म तारीख, पत्ता इ.
आरोग्य विषयक पूर्व इतिहास
पूर्वीच्या शारीरिक तपासणीची माहिती
दिलेल्या सेवा व उपचार यांची नोंद
संदर्भ सेवा आणि पाठ पुरावा केल्याच्या नोंदी.
या नोंदी शाळा व समाजामध्ये आरोग्याचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
सारांश : शालेय आरोग्य परिचारिका मुलांना आरोग्यदायी जीवन मिळविण्यास प्रेरित करते व शैक्षणिक प्रगती करण्यास मदत करते. आजचा विद्यार्थी उद्याचा यशस्वी नागरिक होण्यास मदत होते.
संदर्भ :
डॉ. जे. इ.पार्क, आरोग्य परिचर्या सामाजिक.
डॉ. जगन्नाथ दीक्षित (अनुवादक), आरोग्य परिचर्या सामाजिक.
आनंदमयी आणि आरोग्यदायी शाळा | व्याख्याने व परिसंवाद | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
इतर निबंध व भाषणे -
२) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
४) सुजाण पालकत्व - इथे क्लिक करा
५) मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण-इथे क्लिक करा
६) प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा -इथे क्लिक करा
७) लिंग समानता जोपासणारा समाज-इथे क्लिक करा
आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला Join व्हा. ग्रुप सेटिंग Only Admin असेल.
जिल्हानिहाय व्हॉट्सअप ग्रुप - इथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुपला समाविष्ट व्हा - https://t.me/+STR7BmsY5ErbaVSV
Tags
बालिका दिन