{getToc} $title={इथे क्लिक करा-महत्वाचे मुद्दे}
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देणेबाबत.
उपरोक्त संदर्भीय अनुसरून पोषण आहार योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. सदर योजने अंतर्गत इ.१ ली ते ५ वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) आणि १२ ग्रॅम (प्रोटीन) युक्त दुपारचे मध्यान्ह भोजन तसेच इ. ६ वी ते ८ वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक (कॅलरी) आणि २० ग्रॅम (प्रोटीन) युक्त आहार देण्यात येतो. कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजना म्हणून माहे मार्च २०२० पासून शाळा स्तरावर शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्याऐवजी कोरडा शिधा दिला जात आहे. केंद्र शासनाने संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये पात्र विद्यार्थ्यांना कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांचे पालन करून शाळा स्तरावर तयार आहार देणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वी च्या शाळा दि.०१ फेब्रुवारी, २०२२ पासून सुरु करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेवून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळेचा कालावधी निश्चित करुन त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यातील कोविड-१९ च्या प्रादुर्भावाची स्थिती नियंत्रणात आल्याने राज्यातील योजनेस पात्र शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दि. 15 मार्च 2022 पासून शाळा स्तरावर तयार आहार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना तयार आहाराचा मध्यान्ह भोजन लाभ देणेबाबत खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
1. सरल प्रणाली अंतर्गत एमडीएम पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणेबाबत:
1.1 सर्व शाळांनी सरल प्रणाली अंतर्गत कार्यान्वित एमडीएम पोर्टलमध्ये आपल्या शाळेतील मुख्याध्यापक शापोआ योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत आहेत किंवा नाही याची खात्री करून तालुका स्तरावरून संबंधितांचे नावे व मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घ्यावीत.
1.2 शाळेचे मुख्याध्यापक व शापोआ योजनेचे काम पाहणारे शिक्षक यांनी एमडीएम मोबाईल अॅप डाऊनलोड करून लॉगिन करून तपासून घ्यावे. जेणेकरून शाळा स्तरावर आहार शिजवून देण्यास सुरुवात झाल्यास पहिल्या दिवसापासून एमडीएमची माहिती पोर्टलवर नोंदविणे शक्य होईल.
1.3 शाळांचे एमडीएम वेबसाईटवरील लॉगिन आयडी व पासवर्ड तपासून घ्यावेत. अद्ययावत नसतील तर केंद्र प्रमुख लॉगिनवरुन शाळा पासवर्ड रिसेट करून घ्यावेत. तालुका स्तरावरून प्रत्येक शाळेची योजनेस पात्र पटसंख्या एमडीएम पोर्टलमध्ये अचूकपणे नोंदवावी. आणि शाळा स्तरावर पटसंख्येमध्ये होणाऱ्या बदलानुसार पटसंख्या अद्ययावत करण्यात यावी.
1.4 शिजविलेल्या आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप सुरु झाल्याच्या दिवसापासून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची सर्व शाळानी दैनंदिन माहिती एमडीएम पोर्टलवर भरतील याची योग्य ती खबरदारी घ्यावी.
1.5 जिल्ह्यातील योजनेस पात्र शाळांची नोंद व संख्या एमडीएम पोर्टलवर असल्याची खात्री करून घ्यावी. ज्या शाळा बंद झाल्या आहेत अशा शाळा एमडीएम पोर्टल मधून वगळण्यात याव्यात आणि योजना लागू असलेल्या सर्व शाळा एमडीएम पोर्टलमध्ये समाविष्ट करणेकरीता संचालनालयास प्रस्ताव सादर करावा.
1.6 शाळांना एमडीएम पोर्टल संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत तालुका व जिल्हा स्तरावरून मार्गदर्शन करून निराकरण करण्यात यावे.
1.7 उपरोक्त सर्व कामे दिनांक ११ मार्च, २०२२ पर्यंत पूर्ण होतील याची खबरदारी घेण्यात यावी.
1.8 आहार शिजवून देणाऱ्या यंत्रणेची इंधन व भाजीपालाची देयके शाळा स्तरावरून दररोज भरण्यात येणाऱ्या लाभार्थी संख्येनुसार अदा करण्यात येतील. सबब क्षेत्रीय यंत्रणेने नियमितपणे एमडीएम पोर्टलवर तालुक्यातीलस शाळा दैनंदिन माहिती अचूक परिपूर्ण भरत असल्याची खात्री करावी.
1.9 शाळा स्तरावर पुरवठादारामार्फत वितरीत करण्यात आलेल्या तांदूळ व धान्यादि मालाची नोंद पुरवठादारामार्फत एमडीएम पोर्टल वर केली जात असल्याची खात्री करून पुरवठादाराची देयके प्राप्त झाल्यानंतर पोहोच पावतीवरून शाळानिहाय तांदूळ व धान्यादी मालाच्या नोंदी एमडीएम पोर्टलमध्ये अंतिम कराव्यात. पुरवठादारासोबत करण्यात आलेल्या करारनाम्यातील अट क्र. २९ चे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घ्यावी.
2. आहार शिजविणाऱ्या यंत्रणेची निश्चिती करणे :
1. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या शाळा वगळून योजनेस पात्र असलेल्या सर्व शाळांकरीता आहार शिजवून देणारी यंत्रणा कार्यरत नसल्यास शालेय व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करुन सदर यंत्रणेची व स्वयंपाकी/ मदतनीस यांची नियुक्ती करण्यात यावी.
2. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या शाळांना तयार आहाराचा पुरवठा करण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या संस्था/बचतगटाची मुदत संपुष्टात आली असल्यास प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या दिनांक १६ मार्च २०१९ च्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांनुसार स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रिया राबवून संस्था/बचतगटाची नियुक्ती करण्यात यावी.
3 शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृह स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंपाकी/ मदतनीस यांना गंभीर तसेच संसर्गजन्य आजार नसल्याची खात्री करावी. स्वयंपाकी/ मदतनीस यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेण्यात यावे.
3. कोविड १९ च्या प्रादुर्भावास प्रतिबंध करणेकरीता करावयाच्या उपाययोजना:
1. स्वयंपाकी/मदतनीस यांनी कोविड- १९ प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याची खातरजमा मुख्याध्यापकांनी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र जतन करून ठेवावे. तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह बचतगट/संस्थांच्या बाबतीमध्ये बचतगट/संस्था प्रमुखांनी स्वयंपाकी/मदतनीस/कामगार यांनी प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याची खातरजमा करून त्याबाबतचे प्रमाणपत्र जतन करून ठेवावे व त्याची एक प्रत मुख्याध्यापक यांचेकडे जमा करण्यात यावी. ज्या स्वयंपाकी / मदतनीस / कामगार यांनी सदरचे दोन्ही डोस घेतले नसतील त्यांना अन्न शिजविण्याच्या व वितरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग देवू नये.
2. स्वयंपाकी / मदतनीस / कामगार हे स्वतः व त्यांच्या कुंटूंबातील एकही सदस्य कोविड- १९ आजाराने बाधित झाल्यास याची कल्पना शाळांना तात्काळ देऊन अशा स्वयंपाकी/मदतनीस यांनी विलगीकरणाचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत आहार शिजविणे व वाटप करणे या कामामध्ये सहभाग नोंदवू नये.
3. स्वयंपाकी/मदतनीस/कामगार यांनी शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर मास्क वापरणे बंधनकारक राहील.
4. शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृहामध्ये स्वयंपाकी/मदतनीस/ कामगार यांचे दररोज तापमान घेण्यात यावे.
5. स्वयंपाकी / मदतनीस/कामगार यांनी त्यांचे हात साबण/ सॅनिटायझरचा वापर करुन किमान ४० सेकंद धुणे आवश्यक आहे.
6. स्वयंपाकी/मदतनीस/कामगार यांनी शाळेच्या आवारामध्ये व विशेषतः अन्नपदार्थ हाताळतांना/ आहार शिजविताना/ विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप करताना थुंकणे व नाक शिंकरणे यास सक्त मनाई असावी.
7. स्वयंपाकी / मदतनीस यांनी योग्य स्वच्छ संरक्षणात्मक ऍपॉन आणि केस झाकण्यासाठी हेड गियर आणि हातमोज्यांचा वापर करावा.
8. स्वयंपाकी/मदतनीस यांनी शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर आहार वाटप करुन शाळेच्या आवारातून बाहेर पडेपर्यंत तसेच केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या बाबतीत केंद्रीय स्वयंपाकगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर बाहेर पडेपर्यंत पूर्ण वेळ मास्क परिधान करणे आवश्यक आहे.
4. स्वच्छता, सुरक्षितता आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत:
1. माहे मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यामध्ये स्वयंपाकगृह व धान्यकोठी यांची संपुर्ण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
2. अन्न शिजवण्यापूर्वी आणि नंतर दररोज स्वयंपाकगृह व भांडी स्वच्छ करणे आवश्यक आहे.
3. स्वयंपाकगृह / धान्य कोठीतील छत. खिडक्या व सर्व भागामधील होणाऱ्या जाळ्या व जळमटे वेळोवेळी काढून स्वच्छता ठेवावी. स्वयंपाकगृह व धान्य कोठीतील इलेक्ट्रीक वायरिंग सुस्थितीत असल्याची खातर जमा करावी. अन्नपदार्थाच्या थेट संपर्कामध्ये येणारे स्वयंपाकगृहातील पृष्ठभाग वापर करण्यापूर्वी नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवणे आवश्यक आहे.
4. स्वयंपाकगृहातील सांडपाणी व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशा तरतदीमह कार्यक्षम सांडपाण्याची व्यवस्था असावी.
5. स्वयंपाकगृहातील खडबडीत पृष्ठभाग, भेगा, उघडे सांधे इत्यादी शक्य तितक्या लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. कचरा, सांडपाणी, स्वच्छतागृहे उपडे नाले आणि भटकी जनावरे यांसारखे अन्न दूषित करणारे संभाव्य स्त्रोत स्वयंपाकगृहापासून दूर ठेवावेत.
6. स्वयंपाकगृहामध्ये नैसर्गिक/ यांत्रिक पध्दतीने हवा खेळती राहिल याची दक्षता घेण्यात यावी.
7. स्वयंपाकगृहातील अग्रिशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करावी. अग्रिशमन यंत्रणा मुदतबाह्य झाली असल्यास पुनर्भरण करून घेण्याची दक्षता घेण्यात यावी.
8. शालेय पोषण आहाराच्या स्वयंपाकासाठी आणि पोषण आहार वाटप करण्याची भांडी आहार शिजविण्यापूर्वी व शिजविल्यानंतर चांगल्या प्रकारे स्वच्छ करुन ती सुकविणे आवश्यक आहे.
9. साफ-सफाईकरिता वापरण्यात येणारे कापड, मॉप्स आणि ब्रश यासारख्या साफ-सफाईच्या उपकरणांद्वारे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून अशी उपकरणे वापरल्यानंतर ते पूर्णपणे धुऊन, स्वच्छ आणि उन्हात वाळवणे आवश्यक आहे. अशी उपकरणे अन्नपदार्थापासून दूर ठेवावीत आणि त्यांना संपर्क अन्नपदार्थांशी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
10. स्वयंपाकगृहातील टेबल किंवा बेंच, पेठ्या कपाटे व रैंक नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावेत.
11. शिजविलेले अन्न व्यस्थितरित्या बंद झाकणाद्वारे झाकून ठेवावेत. जेणेकरून धूळ माश्या कीटक व अन्य संसर्गापासून अन्न सुरक्षित राहील.
12. योजनेचे धान्य व धान्यादी माल सुस्थितीत व व्यवस्थितरित्या साठवणूक करावी.
13. माहे मार्च २०२० पासून कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृह गोदामामध्ये शिल्लक राहिलेला मुदतबाह्य धान्यादी वस्तूंचा वापर पोषण आहार शिजविण्यासाठी करण्यात येऊ नये.
14 विद्यार्थ्यांना पुर्णवेळ शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी.
15. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याचा सतत पुरवठा पुर्णवेळ होत नसल्यास आवश्यक प्रमाणात पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात यावी.
16. शाळा/केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतील पाणी साठविण्याच्या टाकीची संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. स्वच्छता केल्याचा दिनांक नमूद करून ठेवावा आणि विहित कालावधीने नियमितपणे टाकीची स्वच्छता करावी.
17. अन्नधान्य भाजीपाला स्वच्छ करण्यासाठी आणि शिजविण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
5. आहार शिजवितेवेळी व आहाराचे वाटप करतेवेळी घ्यावयाची दक्षता:
स्वयंपाकगृहामध्ये आहार शिजवितेवेळी आहार शिजविणाऱ्या व मदत करणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मजाव करण्यात यावा.
2. विद्यार्थ्यांना आहार वाटपाची व जेवणाची जागा जेवण्यापुर्वी व नंतर स्वच्छ करणे आवश्यक आहे.
3. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे वाटप करताना व विद्यार्थी जेवण करत असताना सोशल डिस्टंसचा वापर करावा. शाळेमध्ये जागा अपुरी असल्यास सोशल डिस्टंसच्या नियमांचे पालन करण्यासाठी टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना आहार वितरीत करता येईल. तसेच सोशल डिस्टंसच्या नियमांचे पालन करण्यासाठी त्यांच्या संबंधित वर्गखोल्यांमध्ये मध्यान्ह भोजन आहार देता येईल.
4. शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण करण्यासाठी नियोजित असलेल्या जागेवर विशिष्ट प्रकारच्या चिन्ह/खुणा करता येतील जेणेकरून सोशल डिस्टंसचे पालन होण्यास मदत होईल.
5. स्वयंपाकी / मदतनीस यांनी आहार वाटप करताना चेहऱ्यावरती मास्क हातामध्ये हातमोजे व हेडकव्हर चा वापर करून विद्यार्थ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे.
6. विद्यार्थ्यांना आहार वाटप करताना आहाराचे तापमान किमान ६५ डिग्री सेल्सिअस ठेवावे.
7. एका ताटामध्ये/ डब्यामध्ये एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या आहार ग्रहण करु नये.
8. जेवणापुर्वी आणि जेवणानंतर विद्यार्थ्यांनी नियमितपणे हात धुणेकरीता साबण/हॅन्डवॉशचा वापर करत किमान ४० सेकंद हात धुणे आवश्यक आहे.
9. विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याची जागा शाळांनी निश्चित करुन घ्यावी. जेणेकरुन विद्यार्थी सोशल डिस्टंसचे पालन करून विद्यार्थ्यांना हात धुणे शक्य होईल. याकरीता रिकाम्या प्लास्टिक बॉटलमध्ये साबणाचे पाणी हात धुणेकरिता वापरता येईल.
10. विद्यार्थ्यांनी त्यांचे हात साबणाचा वापर करून किमान ४० सेकंद धुणे अनिवार्य आहे.
11. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हात धुणेकरीता आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील किंवा सदरच्या सुविधा या अपुरे प्रमाणात असतील अशा ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना हात धुणेकरीता बादलीमध्ये पाणी व मग ची व्यवस्था करण्यात यावी.
12. वरील सर्व सूचनांचे पालन होत आहे किंवा कसे? याची पाहणी करून उक्त नियमांचे पालन करणेबाबत शाळेतील सर्व शिक्षकांनी सामुहिकरित्या प्रयत्न करावेत.
1. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या शाळांना तयार आहाराचा पुरवठा दि. १६ मार्च २०१९ चे परिपत्रक व केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीबाबत वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना तयार आहार उपलब्ध करून देणे अनिवार्य राहील. तसेच उक्त परिपत्रकामध्ये दिलेल्या मुद्दा क्र. 2.1,2.5,2.6,2.7,2.8 मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
2. जिल्हा स्तरावरील अधिकारी, तालुका स्तरावरील अधिकारी व विस्तार अधिकारी शिक्षण यांची व्हिडीओ कॉनफरन्सद्वारे बैठका आयोजित करून शाळा स्तरावर शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन देण्याबाबत चर्चा करून सूक्ष्म नियोजन करावे. तसेच शाळा स्तरावर आहार देण्यास सुरुवात झाल्यानंतर येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना व बेस्ट पॅक्टीसेस याबाबत पुनश्चः बैठक घ्यावी.
3. गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक (शापोआ विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्र प्रमुख) यांनी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची खात्री करून आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे.
4. सदरचे परिपत्रक सर्व शाळा व अन्न शिजवून देणाऱ्या यंत्रणा यांना उपलब्ध करून द्यावे.
_माहितीस्तव