भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण भाषण/निबंध | Babasaheb Aambedkar yanche Balpan
डॉ. बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ यांनी पुण्यात आपले शिक्षण पूर्ण केले. पंतोजी शाळेमध्ये ते होते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली.
14 वर्षे मुख्याध्यापकांचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू येथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. कारण महूला मिलिटरी हेडकॉर्टर्स ऑफ वॉर म्हणून ओळखले जाई. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला.
भिमाबाई यांच्या पोटी जन्म घेणारे डॉ. बाबासाहेब हे 14 वे अपत्य होते. भिमाबाई यांचे पुढे बाबासाहेबांच्या बालपणीच निधन झाले. (भिमाबाई यांची समाधी सातारा येथे आहे.) बाबासाहेबांचे नाव 'भीम' असे ठेवण्यात आले.
नंतर 'भीम' यांचे भीमराव त्यांचे पूर्ण नाव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर आणि यांना नंतर लोक आपले बाबा संबोधू लागले आणि नंतर ते सर्वांचे 'बाबासाहेब' झाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव - डॉ.भीमराव रामजी आंबेडकर आहे. या भिमाचा सांभाळ डॉ. आंबेडकरांची आत्या मीराबाईंनी केला. हा भीम बुद्धिवान व्हावा, त्याने दीनदलित समाजाचा उद्धार करावा. अशी पिता रामजी सुभेदार यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी लहानपणीच बाळ 'भीम' यांच्यावर पाच मुल्यसंस्कार रुजवले होते.
1) शिक्षण
2) शिस्त
3) स्वावलंबन
4) स्वाभिमान
5) कठोर परिश्रम. या मूल्यांचा बाबासाहेबांनी आपल्या जीवनात अंगीकार केला आणि त्यानुसार वाटचाल केली आणि पुढे हा 'भिम' या देशातील दीनदलितांचा उद्धारकर्ता, भारतीय राज्यघटनेचा निर्माता ठरला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाला म्हणजेच 'महु' ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. महू इथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात. महू येथे बाबासाहेबांच्या जन्मस्थळावर शासनाने यथोचित स्मारक उभे केले आहे हे स्मारक एक चैतन्याचा झरा आहे. (मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासाच्या अंतरावर व इंदौर येथून 20 किलोमीटरच्या अंतरावर महू आहे.)
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 'आंबडवे' वे हे त्यांचे मूळ गाव. अतिशय कमी लोकसंख्येचे , बाबासाहेबांच्या पूर्वजांचे आंबडवे गाव. डॉ.आंबेडकर आडनावाची कहाणी मोठी रंजक आहे. 'आंबडवे' गावात सपकाळ कुटुंबीय राहते. बाबासाहेबांचे आडनाव सपकाळ. नंतर त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांचे आडनाव सातारा येथील प्रतापसिंह शाळेत आंबाडवेकर असे 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदविले.
आजही 7 नोव्हेंबर हा शाळा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 'शाळा प्रवेश दिन' म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांचे नाव नोंदवलेले रजिस्टर आणि त्यांची स्वाक्षरी पहावयास या शाळेमध्ये मिळते. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण सातारा येथेच गेले.