डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू भाषण / निबंध | Dr. Babasaheb Aambedkar Yanchya Vyaktimatvache Vividhangi Pailu
आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे महापंडित विचारवंत या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावलौकिक सर्वांनाच परिचित आहे. सभोवतालच्या दुःखाला आव्हान देत ते येतात आणि व्यक्तिगत जीवनाचा त्याग करून समाजातल्या दुःखभरल्या रात्री आणि अंधारलेली मने लख्ख उजळवून टाकतात, अशा मराठी मातीत ज्या असंख्य समाज सुधारकांनी जन्म घेतला त्यापैकी २० व्या शतकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुवर्ण अक्षरात कोरावं लागेल, की ज्यांनी त्याकाळात राष्ट्रीय एकात्मतेसाठी खरी पावलं उचलली. "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा.." असा अस्पृश्य बांधवांना संदेश देणारे बाबासाहेब.. समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणारे बाबासाहेब.. देशाला संविधान देऊन महान कार्य केलेले बाबासाहेब.. ऊर्जानिर्मिती व जलसंधारणाबाबत देश स्वयंपूर्ण व्हावा म्हणून ,हिराकूड, दामोदर खोरे सिंचन प्रकल्प राबविणारे बाबासाहेब.. यासह अनेक पैलू असणाऱ्या बाबासाहेबांचे समाजाप्रती असलेले शेतीविषयक, आर्थिक, सामाजिक विचार अत्यंत मोलाचे आहे, आणि याच विचारातून एक संघ भारत निर्माण झाला आहे,असे वाटते.
वकिलीमुळे बाबासाहेबांचा समाजाशी घनिष्ट संबंध आला व त्यातूनच त्यांना जातीयतेच्या भेदभावाच्या रुक्ष कडा दिसू लागल्या. समाजाच्या उद्धारासाठी व अस्पृश्यतेच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन अशाप्रकारे असमानतेचा निषेध केला. मानवतेच्या हक्कांसाठी, सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले. अशा या महान उद्धारकाने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे पवित्र काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात आले. देशाला संघटित करण्याचे कार्य केले. राष्ट्रीय एकात्मता साधायची असेल तर देशातील गरीब लोकांचा आर्थिक स्तर उंचावला गेला पाहिजे असा विचार बाबासाहेबांचा होता. आर्थिक प्रगतीचा वेग वाढविणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, श्रमिक तथा सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे, भविष्यातील आर्थिक विकासाचा पाया असणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग वाढविणे, रोजगाराभिमुख तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या लघु व कुटीर उद्योगांना विशेष सवलती देणे, प्रादेशिक समतोल विकास साधणे, आर्थिक सत्ता व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे, शहरी व ग्रामीण भागातील दरी मिटविणे, आर्थिक असमानता दूर करणे, सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या दलित,आदिवासी व महिला वर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता संधी उपलब्ध करून देणे, समाजात एकी निर्माण करणे आदी महत्वपूर्ण कार्य बाबासाहेबांनी केले. स्वावलंबन व अंतिमतः गरिबी दूर करणे असा त्यांचा आर्थिक विचार होता.
याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्यविषयक व संस्कृतीविषयक योगदान हे मौलिक स्वरूपाचे होते. त्यांच्या साहित्यविषयक कार्याचा प्रारंभ त्यांच्या वृत्तपत्रीय वाडःमय निर्मितीतून होतो. बाबासाहेबांनी 'मूकनायक' या वृत्तपत्राची केलेली सुरुवात ही एक अभिनव स्वरूपाची घटना होती. जाती-धर्माच्या जोखडात पिचलेल्या मूकनायकाला वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचा मिळवून दिली. 'काय करू आता धरूनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले ।। नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।' या संत तुकाराम महाराजांच्या ओळी मूकनायकाच्या बिरुदावली म्हणून वापरल्या गेल्या. पुढे ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक नव्याने सुरु केले. त्यानंतर 'जनता' हे नियतकालिक काढले. 'जनता' या नियतकालिकेचे शेवटी 'प्रबुद्ध भारत' या वृत्तपत्रात रूपांतर झाले. 'मूकनायक' ते 'प्रबुद्ध भारत' असा प्रवास होत असताना डॉ. बाबासाहेबांची लेखणी अधिकच समृद्ध होत विविधांगी विषयाचा वेध घेऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
*Administration and Finanace of East India Company,
*The National Dividend of India: A Histrorical and Analytical Study,
*Castes in India: Their Mechanism,
*Genesis and Development, Federation Versus Freedom,
*The Problem of Rupees: Its Origin & Its Solution,
*Pakistan or The Partition of India,
*Annihilation of Castes,
*Ranade, Gandhi and Jinnah,
*Mr.Gandhi and the Emancipation of the Untouchables,
*What Congress and Gandhi have done to the Untouchables,
*Communal Deadlock and a way to solve it,
*States and Minorities-What are their rights and how to secure them in the Constitution Free India,
*Who were Shudras? How they came to be the Fourth Verna in Indo-Aryan Society, *The Riddles in Hinduism,
*Maharashtra as a Linguistic Province,
*Thoughts on Linguistics States,
*The Rise and Fall of Hindu Women,
*The Pali Grammar, Dictionary and Bouddha Pujapath,
*Buddha and his Dhamma,
*Small Holdings in India and their Remedies,
यासारखे अनेक अभ्यास पूर्ण ग्रंथ लिहिले.
आपल्यापैकी अनेकांना माहिती नसलेले बाबासाहेबांचे कार्य म्हणजे सिंचन व ऊर्जाविषय कार्य. देशाच्या कृषी व उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक बाब म्हणजे पाणी आणि वीज होय. त्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असे शहाणपण बाबासाहेबांनी देशाला दिले. स्वातंत्र्यापूर्वी व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांकडे सार्वजनिक बांधकाम, सिंचन, ऊर्जा व श्रम मंत्रालय ही खाती होती. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर जलसंपत्ती विकासासाठी देशाच्या विविध नद्यांच्या खोऱ्यांच्या विकास, सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी नदी खोरे विकास प्राधिकरण, सिंचन व ऊर्जा प्रकल्पाच्या यशस्वी अंबालबजावणीसाठी कुशल तंत्रज्ञ गटाची स्थापना केली. याचाच परिपाक म्हणजे आजचे केंद्रीय जल आयोग. डॉ.आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून व अभ्यासपूर्ण नियोजनातून हिराकूड व सोन नदी प्रकल्प, दामोदर खोरे योजना, महानदी व कोसी नदी योजना यशस्वीपणे राबविल्या. तसेच सध्या जे केंद्रीय ऊर्जा प्राधिकरण आहे, त्याची मूलतः सुरुवात १९४४ साली स्थापन झालेल्या केंद्रीय ऊर्जा मंडळातून झाली, जे की बाबासाहेबांच्या प्रयत्नातून घडले. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देशातील सिंचन व ऊर्जा धोरणाचे पितामह म्हणतात.
म्हणूनच बाबासाहेबांबद्दल म्हणावंसं वाटतं, २० व्या शतकातील अतुलनीय असामान्य बुद्धिजीवी व्यक्तिमत्व ज्यांनी "सर्वेपि सुखिन: संतु | सर्वे संतु निरामय:" या अर्थाचं ज्ञानदेवांचं पसायदान वास्तवात आणण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं....
बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू भाषण / निबंध | Dr. Babasaheb Aambedkar Yanchya Vyaktimatvache Vividhangi Pailu