क्षेत्रभेट आठवडी बाजार / भाजी मंडईला भेट | कृषीविषयक साक्षरता-1 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
६) कृषीविषयक साक्षरता
उपक्रम क्रमांक: १
उपक्रमाचे नाव : क्षेत्रभेट आठवडी बाजार / भाजी मंडईला भेट
पूर्वनियोजित कृती :
• क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत शिक्षक परिसरातील आठवडी बाजार/भाजी मंडई या ठिकाणी क्षेत्रभेट नियोजन करतात. आठवडी बाजार/भाजी मंडई भेट आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, विविध प्रकारची फळे, सुकामेवा, मासे, कडधान्ये, तेलबिया इत्यादींचे निरीक्षण करणे. त्यांची इंग्रजी आणि मराठी भाषेतील नावे शोधणे.
विकसित होणारी कौशल्ये- फलनिष्पत्ती संप्रेषण कौशल्य, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, संवेदनशीलता इत्यादी.
आवश्यक साहित्य : वही, पेन, क्षेत्रभेट दरम्यान पाण्याची बाटली आणि इतर आवश्यक साहित्य इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक आपल्या परिसरातील आठवडी बाजार/भाजी मंडईला भेट देण्याचे नियोजन करतात.
२) आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आठवडी बाजार/भाजी मंडईला भेटीदरम्यान काय निरीक्षण करावयाचे याबाबत सविस्तर सूचना देतात.
३) नियोजनाप्रमाणे आठवडी बाजार/भाजी मंडईला भेट देऊन विद्यार्थ्यांना आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, विविध प्रकारची फळे, दुग्धपदार्थ, तेलबिया, कडधान्ये इत्यादींचे निरीक्षण करावयास सांगतात.
४) भेटीदरम्यान शिक्षक विद्यार्थ्यांना खालील प्रश्न विचारतात.
• विद्यार्थ्यांना बाजारात कोणकोणत्या भाज्या, फळे, कडधान्ये विक्रीसाठी आहेत त्यांची नावे सांगा.
आठवडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध भाज्यांचे वर्गीकरण फळभाज्या व पालेभाज्या यामध्ये करा.
• आठवडी बाजारामध्ये किंवा भाजी मंडईमध्ये विक्रीसाठी येणारा माल कोणत्या गावाहून किंवा कोणत्या ठिकाणाहून आणला जातो?
• आठवडी बाजार किंवा भाजी मंडईचा गावातील लोकांना काय उपयोग होतो ते सांगा.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी आठवडी बाजार क्षेत्रभेट उपक्रमामध्ये सहभागी होतात.
२) विद्यार्थी नियोजनाप्रमाणे आठवडी बाजार/भाजी मंडईला भेट देऊन आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, विविध प्रकारची फळे, दुग्धपदार्थ, तेलबिया, कडधान्ये इत्यादींचे निरीक्षण करतात.
३) गटामध्ये किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत भेटीदरम्यान भाजी विक्रेत्यांशी संवाद साधतात.
४) विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देतात.
संदर्भ साहित्य :
१) ग्रंथालयात उपलब्ध क्षेत्रभेटीवर आधारित माहिती पुस्तिका.
टीप : वरील कृतीप्रमाणेच शिक्षक क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत आपल्या परिसरातील बगीचा, परिसरातील नर्सरी किंवा गावातील शेती या ठिकाणी भेट देऊन क्षेत्रभेट उपक्रम राबवू शकतात.