जल ही जीवन है | एकविसाव्या शतकातील कौशल्ये-1 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
९) एकविसाव्या शतकातील कौशल्ये
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : जल ही जीवन है !
पूर्वनियोजित कृती :
• पाणी म्हणजे जल. जल म्हणजे जीवन म्हणूनच जल हे तो कल है! थोडक्यात, जल ही जीवन है! हा संदेश विद्यार्थी जीवनातच रुजायला हवा. शिक्षक विद्यार्थ्यांशी आदल्या दिवशी मैदानावर वरीलप्रमाणे संवाद साधतात आणि पुढील बाबतीत माहिती संकलित करायला सांगतात.
• पाण्याचे उपयोग.
• पाण्याचे स्रोत
पाणी बचतीसाठी उपाययोजना
पाण्याचे महत्त्व
रेन वॉटर हार्वेस्टिंग
पाणी अडवा, पाणी जिरवा इत्यादी.
२) उपक्रमाच्या आदल्या दिवशी शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांचे गट तयार करून घेतात.
३) पाण्यासंदर्भात आवश्यक ती माहिती गटनिहाय संकलित करण्यासाठी शिक्षक विदयार्थ्यांना वृत्तपत्र, क्रमिक पुस्तके, दीक्षा अॅप इत्यादींची मदत घेण्यास सांगतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- चिकित्सक विचार, स्वजाणीव, परिणामकारक संप्रेषण, समस्या निराकरण.
आवश्यक साहित्य : क्रमिक पुस्तके, वृत्तपत्रे, वही, पेन, वृक्षारोपणासाठी विविध प्रकारच्या बिया इत्यादी. शिक्षक कृती : शिक्षक विद्यार्थ्यांना गटनिहाय पुढीलप्रमाणे तोंडी प्रश्न विचारून संवाद घडवून आणतात.
१) पाण्याचा उपयोग आपण कोणकोणत्या कामासाठी करतो ?
२) पाणी दूषित होऊ नये म्हणून कोणते उपाय करता येतील ?
३) पाणी हेच जीवन आहे असे का म्हणतात?
४) पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती आहे ?
५) पाणी बचतीसाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील ?
६) अनेक वेळा ग्रहण काळातील पाणी टाकून दिले जाते याबद्दल आपले मत काय आहे?
७) उन्हाळ्यात आठ दिवस नळाला पाणी आलेच नाही, तर घरच्या घरी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे ?
८) वाळवंटात गेलात तर तुम्ही पाण्याची गरज कशी भागवणार?
९) दुबई-भारत भुयारी मार्गाबद्दल आपणांस काही माहिती असल्यास त्याबद्दल सांगा.
१०) राजस्थानमध्ये जल पुनर्भरणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?
११) उदयपूर हे वाळवंटातील शहर असूनही थंड ठिकाण म्हणून का ओळखले जाते?
१२) पाणीटंचाई समस्या निराकरणासाठी तूम्ही काय करू शकता?
वरीलप्रमाणे अनेक प्रश्न विचारून, विद्यार्थ्यांत संवाद घडवून आणतात. आपल्या जीवनातील पाण्याचे महत्त्व, पाण्याची बचत, पाणी-समस्या निवारणबाबत आपली जबाबदारीविषयक सुसंवाद साधतात.
विद्यार्थी कृती :
१) शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.
२) पाण्याचे महत्त्व जाणून आपली जबाबदारी समजून घेतात. इतर तत्सम उपक्रमात सहभाग नोंदवतात.
३) विदयार्थी या उपक्रमामुळे प्रेरित होऊन आपल्या परिसरात पाणीबचतीसाठी प्रयत्न करतात.
संदर्भ साहित्य : क्रमिक पुस्तके, वृत्तपत्र, दीक्षा अॅपवरील व्हिडिओ. शिक्षक वरील कृतीसोबत तत्सम प्रकारच्या पुढील काही नावीन्यपूर्ण कृती इयत्तेला अनुसरून विदयार्थ्यांकडून करून घेतात.
इस्राईलची शेतीबाबत माहिती संग्रहित करा.
पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो याबद्दल थोडक्यात लिहा.
विविध प्रकारच्या बियांचे संकलन करून बीज बँक तयार करा.
स्थानिक परिस्थितीनुसार पाण्याचे स्रोत उदा., नदी, विहीर, कालवा, तलाव, धरण, पाझर तलाव इत्यादी ठिकाणी क्षेत्रभेट आयोजन.
जल पुनर्भरणसाठी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचे श्रमदान.
एक मूल, एक झाड अंतर्गत वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करणे.
पाण्याचे महत्त्व स्पष्ट करणाऱ्या घोषवाक्यांचे संकलन, वादविवाद स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धाचे आयोजन.
पाण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थी स्वरचित कविता लेखन, नाट्यीकरण, पथनाट्य, जनजागृतीकरिता रॅलीचे आयोजन हस्तलिखित भित्तिपत्रक इत्यादी उपक्रमांचे आयोजन करतात.