परिसर भेट/निसर्ग फेरी | पर्यावरण संवर्धन-1 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
३) पर्यावरण संवर्धन
उपक्रम क्रमांक: १
उपक्रमाचे नाव : परिसर भेट/निसर्ग फेरी
पूर्वनियोजित कृती :
• या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या परिसरातील सजीव आणि निर्जिव घटक यांबाबत माहिती होण्यासाठी परिसर भेट / निसर्ग फेरी आयोजित करतात.
या उपक्रमांतर्गत शिक्षक परिसरातील पाण्याचे स्रोत नदी या ठिकाणी परिसर भेटीचे नियोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये/फलनिष्पत्ती निरीक्षण क्षमता, चिकित्सक वृत्ती, संप्रेषण कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन इ.
आवश्यक साहित्य : भिंग, नकाशा, कीटकांचे फोटो व नावे असलेला तक्ता इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक आपल्या शाळेच्या परिसरातील नदी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पक्षी, कीटक यांची माहिती संकलित करतात.
२) आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना परिसर भेट दरम्यान काय निरीक्षण करावयाचे याबाबत सविस्तर सूचना देतात.
३) नियोजनाप्रमाणे परिसराला भेट देऊन विद्यार्थ्यांना फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, मातीचा रंग, कचरा, प्लॅस्टिकच्या वस्तू, प्राणी, पक्षी इत्यादीचे निरीक्षण करावयास सांगतात. सजीव आणि निर्जिव घटक यांची यादी करावयास सांगतात.
४) परिसराला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना परिसरात कोणकोणत्या वस्तू आढळून आल्या याबाबत प्रश्न विचारून व नंतर सजीव आणि निर्जिव घटकांचे वर्गीकरण करण्यास सांगतात. याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यांचे प्रतिसाद घेऊन त्याच्या नोंदी करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी परिसर भेट उपक्रमामध्ये सहभागी होतात.
२) विद्यार्थी परिसर भेटीदरम्यान विविध सजीव आणि निर्जीव वस्तूंचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात.
३) गटामध्ये किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत परिसर भेटीदरम्यान त्यांना दिसलेले पाळीव प्राणी, पक्षी प्लॅस्टिकच्या वस्तू, फळझाडे, फुलझाडे या घटकांबाबत संवाद साधतात.
४) विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देतात.
संदर्भ साहित्य :
१) पाळीव प्राणी, पक्षी, फळझाडे, फुलझाडे इत्यादींविषयी माहिती पुस्तिका.