असा मी! असा मी ! | व्यक्तिमत्त्व विकास-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
४) व्यक्तिमत्त्व विकास (माझी वैशिष्ट्ये)
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : असा मी! असा मी !
पूर्वनियोजित कृती :
• विद्यार्थ्यांना स्वतःची संचिका तयार करण्यासाठी आवश्यक मुद्द्यांची माहिती देतात. त्या मुद्द्यांसंदर्भात घरात आई, वडील, मोठी भावंडे यांच्यासोबत चर्चा करण्यास सांगतात. सदर बाबींची मुद्द्यांची नोंद संचिकेत करून घेण्यास सांगतात.
• विदयार्थ्यांकडून माहिती गोळा करण्यासाठी मुद्द्यांची यादी करतात.
१) माझे वजन
२) माझी उंची
३) माझी जन्मतारीख
४) माझा संपर्क क्रमांक
५) माझे छंद
६) माझी आवड
७) माझी नावड इत्यादी.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- संभाषण, शारीरिक विकास, बौद्धिक विकास.
आवश्यक साहित्य- वजनकाटा, उंची मोजण्याचे साधन इत्यादी.
शिक्षक कृती :
१) विद्यार्थ्यांना गटात परस्परांच्या आवडी-निवडी, छंद, माहिती, कुटुंब यांविषयी मुक्त चर्चा करण्यास
सांगतात. उदा., पालकांचा व्यवसाय, आई काय करते? घरातील सदस्य संख्या ?
२) ज्या विद्यार्थ्यांनी माहिती लिहून आणलेली आहे. त्यांची माहिती वाचतात, खात्री करतात. त्यांची संचिका तयार करतात. ज्यांनी माहिती आणलेली नाही त्या विद्यार्थ्यांची वजन, उंची प्रत्यक्ष मोजतात.
३) त्यानंतर, प्रत्येक गटातून दोन विदयार्थी समोर बोलवून प्रथम स्वतःची ओळख करून देण्यास सांगतात. त्यामध्ये विद्यार्थी स्वतःची ओळख, आवडते छंद, आवड-निवड याविषयी व्यक्त होतात.
४) त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या सहभागी मित्राचीदेखील ओळख करून देतात. अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जोडीजोडीने पुढे बोलावून अधिकाधिक व्यक्त कशा प्रकारे होतील यासाठी शिक्षक प्रोत्साहित करतील व वर्गातील इतर विद्यार्थी तसेच आवड-निवड अथवा छंद या बाबींवर चर्चा करून सदर बाबी SWOC (Strength, Weakness, Opportunities, Challenges) यानुसार कसे वर्गीकरण करता येईल याविषयी मुक्तपणे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी उपरोक्त मुद्द्यांच्या अनुषंगाने वैयक्तिक, कुटुंबातील, सदस्यांशी चर्चा करून माहितीची नोंद संचिकेत करतात. तसेच वर्गामध्येही आपल्या वर्गमित्राशी चर्चेमध्ये सहभागी होतात.
२) विद्यार्थी त्यांची संचिका तयार करतात. योग्य ठिकाणी शिक्षकांची मदत घेतात. सदर संचिकेचे जतन करून ठेवतात.