बोलणारी फिंगर पपेट | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-उपक्रम 2 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम व्हिडिओ-
शिक्षक कृती-
१) कार्डशीट पेपरच्या मदतीने एका अर्थ गोलाकारपासून बोटावर बसेल असा कागदी शंकू तयार करून दाखवितात.
२) बोटावर शोभेल एवढ्या आकारात आवडत्या पशु/पक्षी/कार्टुनच्या चेहऱ्याचे चित्र काढतात.
३) काढलेला चेहरा चित्र योग्य रंगात रंगवितात.
४) रंगविलेल्या चेहऱ्याची बाह्य रेषा कात्रीच्या साहाय्याने कापून घेतात.
५) तयार झालेला चेहरा कागदी शंकूच्या वरच्या बाजूवर डिंकाच्या साहाय्याने चिकटवतात. उपरोक्त सर्व कृती सर्व विद्यार्थ्यांना दिसेल या पद्धतीने दर्शवितात फिंगर पपेट पूर्ण झाल्यावर शिक्षक बोटे उंचावून, नाचवून आणि आवाजात बदल करून सादरीकरण करतात.
उदा. मुलांनो नमस्कार मी कपडा कात्रीने करा करा कापतो...... मशीनवर भराभरा शिवतो...... माणसांना घालायला देतो सांगा बरं मी कोण ?
एकदम बरोबर मी आहे टेलर.
हा.. हा.हा हा... तुम्ही सारे खूप हुशार विद्यार्थी आहात. चला पुन्हा भेटूया.... ओके बाय-बाय...!
किंवा
हिरवा हिरवा माझा रंग, चोच माझी लाल... रोज म्हणतो मिठू मिठू, पेरू मला द्याल.. रानात झाडावर राहतो, झोके घेतो, माझे नाव सांगाल ???
मिठू मिठू मिठू मिठू. अगदी बरोबर मी आहे पोपट.
५) विद्यार्थ्यांना कार्डशीट, स्केच पेन, डिंक उपलब्ध करून देतात त्यांना स्वतःच्या आवडीने आवडता पशु/पक्षी/कार्टूनचा चेहरा काढून तो रंगवायला सांगतात.
६) फिंगर पपेट तयार झाल्यावर एक एक विद्यार्थ्याला बोलवून बोट हवेत नाचवून, आवाज बदलून सादरीकरण करायला सांगतात.
७) वर्गातील ४-४ विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एक विषय देतात त्यावर सादरीकरण करायला सांगतात उदाहरणार्थ प्राण्यांची शाळा, पक्ष्यांची सहल
विद्यार्थी कृती:
१) कार्डशीटच्या मदतीने बोटात घालता येईल या प्रकारे शंकू तयार करणे, आवडत्या पशु/पक्षी/कार्टूनचा चेहरा काढून स्केचपेन अथवा रंगाने रंगवणे, पपेट तयार करणे या सर्व कृतींचे निरीक्षण करतात.
२) विद्यार्थी शिक्षकाचे सादरीकरण पाहतात.
३) कागद, डिंकापासून स्वतःच्या बोटावर अंगठ्यावर बसेल असा शकू तयार करतात स्केच पेन/रंगाने कार्डशीटवर आवडत्या पशु/पक्षी/कार्टूनचा चेहरा काढून स्केच पेन अथवा रंगाने रंगवितात.
४) कार्डशीटच्या शंकूवर तयार केलेला पशु/पक्षी/कार्टूनचा चेहरा चिकटवून पपेट तयार करतात.
५) क्रमाने तयार केलेल्या फिंगर पपेटनुसार वैयक्तिकरीत्या सादरीकरण करतात.
६) शिक्षकांनी दिलेल्या विषयावर गटात विचार करून सामूहिकपणे सादरीकरण करतात.
७) इतर सर्व विद्यार्थी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात आणि प्रोत्साहन देतात.