यशस्वी व्यक्तींची मुलाखत (पोस्टमन, लाईनमन, डॉक्टर, ग्रामसेवक, नगरसेवक, शेतकरी, सरकारी नोकरदार इत्यादी.) | क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : यशस्वी व्यक्तींची मुलाखत (पोस्टमन, लाईनमन, डॉक्टर, ग्रामसेवक, नगरसेवक, शेतकरी, सरकारी नोकरदार इत्यादी.)
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक परिसरातील क्षेत्रात ठिकाणी काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तींची माहिती मिळवतात.
यशस्वी व्यक्तीची निवड करून त्यांना याबाबत पूर्वकल्पना देतात व त्यांची परवानगी घेतात.
• मुलाखत घेतेवेळी शिस्तीचे पालन करण्यासंदर्भात विदयार्थ्यांना सूचना देतात. (उदा., शांतता राखणे, आपापसात न बोलणे, मध्येच प्रश्न न विचारणे, एका प्रश्नाचे उत्तर पूर्ण झाल्यानंतर दुसरा प्रश्न विचारावा, महत्त्वाची माहिती लिहून ठेवा, नवीन शब्द ऐकला तर लिहून ठेवावा इत्यादी.)
शिक्षक यशस्वी व्यक्तीच्या उपलब्धतेनुसार व विदयार्थी संख्येनुसार विद्यार्थ्यांचे गट करतात. शिक्षक
विद्यार्थ्यांशी चर्चा करून मुलाखतीमध्ये विचारावयाच्या प्रश्नांची यादी/अनुसूची तयार करतात.
उदा.
(१) तुमचे नाव काय आहे?
(२) तुमचा व्यवसाय कोणता आहे ?
(३) तुम्ही काम करता त्याचे स्वरूप काय आहे?
(४) तुम्हांला तुमचे काम आवडते का?
(५) तुम्ही हे काम कधीपासून करता?
(६) काम करताना कोणकोणती काळजी घ्यावी लागते? इत्यादी
विकसित होणारी कौशल्ये:
निरीक्षण, संप्रेषण, अभिव्यक्ती, भाषिक क्षमता.
आवश्यक साहित्य : वही, पेन, पेन्सिल इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक परिसरात काम करणारे / व्यवसाय करणारे / नोकरी करणारे /शेती करणारे यांची नावे विचारतात.
२) शिक्षक कोणाची मुलाखत घेणार हे विद्यार्थ्यांना विचारून ठरवतात.
३) शिक्षक मुलाखत घेताना पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात व माहिती वहीत लिहिण्यास सांगतात.
४) मुलाखतीनंतर शिक्षक विद्यार्थांसोबत खालील प्रश्नांच्या आधारे चर्चा करतात हे ठरवतात.
उदा.
(१) तुम्ही कोणाची मुलाखत घेतली?
(२) त्यांचे काम/व्यवसाय कोणता होता?
(३) ते काम किती वर्षांपासून करत आहेत ?
(४) त्यांच्या कामात कोणती काळजी घ्यावयाची असते ?
(५) तुम्हाला हे काम करायला आवडेल का?
(६) त्यांची मुलाखत घेऊन तुम्हाला कसे वाटले, काय अनुभव आले इत्यादी.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी त्यांच्या परिसरातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तींची नावे सांगतात.
२) विदयार्थी कोणाची मुलाखत घेणार हे सांगतात.
३) विद्यार्थी शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करतात.
४) विद्यार्थी मुलाखत घेण्यापूर्वी पूर्वनियोजनात तयार केलेली प्रश्नावली लिहून घेतात.
५) विद्यार्थी मुलाखत घेऊन त्याची माहिती वहीत लिहून ठेवतात व मुलाखतीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.