परिसर स्वच्छता उपक्रम | पर्यावरण संवर्धन-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : परिसर स्वच्छता उपक्रम
पूर्वनियोजित कृती :
• इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये 'परिसर स्वच्छता उपक्रम' आयोजित करण्यासाठी विदयार्थ्यांचे गट करणे, शालेय मैदान व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे, तसेच प्लॅस्टिक व ई-कचरा वेगळा करणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संरक्षण व संवर्धन जाणीव जागृती इत्यादी. आवश्यक साहित्य : परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक झाडू, खराटे, कचरापेटी (डस्टबिन) इत्यादी साहित्य.
शिक्षक कृती :
अ) परिसर स्वच्छताबाबत उद्बोधन :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता या विषयावर आधारित माहिती देऊन परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतात.
२) स्वच्छ व सुंदर शालेय परिसर म्हणजे काय, शालेय परिसर स्वच्छ ठेवल्याने होणारे फायदे व स्वच्छ परिसर ठेवण्यामागील विद्यार्थ्यांची भूमिका इत्यादी यांबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
ब) परिसर स्वच्छता
१) शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून 'परिसर स्वच्छता उपक्रम' राबवण्यासंबंधी सूचना देतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांचे ५-७ जणांचा मिळून असा गट करतात व त्यांना परिसरातील कचरा उचलणे, ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे, परिसरातील पाला पाचोळा एकत्र करून शालेय परिसर स्वच्छ करणे इत्यादीबाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतात.
३) गटानुसार विद्यार्थ्यांना स्वच्छता करण्यासाठी झाडू, डस्टबिन इत्यादीचे वाटप करतात.
४) विद्यार्थ्यांना गटनिहाय काम करत असताना शालेय परिसराची विविध ठिकाणे उदा. वर्गखोल्या क्रीडांगण, ग्रंथालय इत्यादी वाटप करतात.
५) दिलेल्या सूचनेनुसार विदयार्थ्यांना परिसर स्वच्छता करण्यास वेळ देऊन परिसराची स्वच्छता करून घेतात.
क) परिसर सुशोभिकरण
• शिक्षक विद्यार्थ्यांना 'परिसर स्वच्छता' या उपक्रमांतर्गत परिसर सुशोभिकरणाकरिता गटनिहाय काम करण्यास सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी होतात.
२) विदयार्थी परिसर स्वच्छतेचे महत्त्व सांगतात व परिसर स्वच्छता उपक्रमात आलेल्या अनुभवांचे सादरीकरण करतात.
संदर्भ साहित्य :
१) इंटरनेट, पर्यावरण स्वच्छतेसंदर्भात माहिती पुस्तिका.
या शिवाय शाळेमध्ये परिसर स्वच्छता उपक्रमांतर्गत खालील कृतींचा समावेश शिक्षक करू शकतात.
१) शालेय परिसरातील फेकून दयावयाच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचे संकलन करून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करणे व प्रदर्शन भरविणे.
२) वनस्पतींचा पालापाचोळा, फुले, पाने, दगड इत्यादींचे संकलन व त्यापासून रंगकाम, चित्र/कलाकृती निर्मिती करणे.
३) 'स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा' अंतर्गत शालेय परिसर सुशोभिकरण करणे.
४) कचरापेटी रंगरंगोटी करणे.
५) स्वच्छतेसंदर्भात घोषवाक्ये तयार करून शालेय परिसरात लावणे.
६) स्वच्छता मॉनिटर नेमून वर्गाची व शालेय परिसराची स्वच्छता करण्यास प्रोत्साहित करणे आणि वर्षाच्या शेवटी 'बेस्ट स्वच्छता मॉनिटर' म्हणून एका विद्यार्थ्याला सन्मानित करणे.