किल्ले व दुर्ग यांना भेटी | जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : किल्ले व दुर्ग यांना भेटी
पूर्वनियोजित कृती :
• विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी सहज शक्य होईल अशा परिसरातील किल्ल्यांचा शोध घेणे.
• पालकसभा घेऊन पालकांची या सहलीसाठी मदत घेणे.
या उपक्रमासाठी आवश्यक साहित्याची यादी करून ते उपलब्ध करून घेणे.
• भेटी दयावयाचे किल्ले, दुर्ग यांचा नकाशा उपलब्ध करून घेणे.
• परिसरातील दुर्ग, किल्ले, गड यांची माहिती असणारी व्यक्ती मार्गदर्शनासाठी सोबत घेणे.
उपक्रमाची उद्दिष्टे :
१) परिसरातील किल्ले, दुर्ग, यांची माहिती करून देणे.
२) अध्ययन-अध्यापन मनोरंजक व आनंददायी करणे.
३) किल्ल्यावर असणाऱ्या घटकांचे बुरुज, तटबंदी, माची, प्रवेशद्वार, खंदक, तोफखाना, धान्यकोठार, किल्ला बांधण्याची कला यांविषयी विद्यार्थ्यांना अवगत करणे.
४) भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांना सजग करणे.
उपक्रमाची कार्यवाही व अंमलबजावणी :
१) शिक्षक पालकसभा घेऊन परिसरातील किल्ले, दुर्ग, गड यांची माहिती घेतील.
२) शिक्षक परिसरातील जवळचे किल्ले, दुर्ग, गड यांची निवड करतील.
३) शिक्षक किल्ल्याची माहिती असणारे पालक व परिसरातील व्यक्ती यांना सोबत घेतील.
४) विद्यार्थी व शिक्षक आवश्यक साहित्य घेऊन किल्ला व दुर्ग यांना भेटी देतील.
५) शिक्षक विद्यार्थ्यांना किल्ल्याकडे जात असतानाच्या मार्गावरील वनस्पती, प्राणी, पक्षी यांचे निरीक्षण करण्यासाठी सांगतील व त्यांची माहिती देतील.
६) शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किल्ल्यावर, गडावर पोहोचल्यावर तेथील प्रवेशद्वार, बुरुज, त्यांना असणारी नावे, खंदक, तोफा, धान्याची कोठारे, तलाव त्यांची नावे, भुयार, चोरवाटा, राजमहाल, मंदिर इत्यादी बाबींची माहिती करून देतील.
७) शिक्षक विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचे महत्त्व सांगतील.
८) विदयार्थी या भेटीदरम्यान मिळालेली सर्व माहिती वहीमध्ये लिहितील व शिक्षकांच्या मदतीने अंतिम करतील.
उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन :
१) क्षेत्रभेटीदरम्यानचे विद्यार्थ्याचे वर्तन, त्यांची तयारी, माहिती मिळवण्याचे कौशल्य याचे शिक्षक निरीक्षण करतील.
२) शिक्षक विदयार्थ्यांचे संवादकौशल्य सुद्धा पाहतील.
३) शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये असणारे प्रश्नकौशल्य, माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा याचेही निरीक्षण करतील.
४) शिक्षक विद्यार्थ्यांनी माहितीची मांडणी व संकलन कसे केले आहे हे तपासतील.
उपक्रमाची फलनिष्पत्ती :
१) विद्यार्थी परिसरातील गड, किल्ले, दुर्ग यांची माहिती मिळवतील.
२) विद्यार्थी जिल्ह्यात लगतच्या परिसरात असणाऱ्या गड, किल्ले, दुर्ग यांची यादी करतील.
३) विद्यार्थी ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यास शिकतील.
४) विद्यार्थी इतिहास लेखनाची प्राथमिक माहिती मिळवतील.