परिसरातील शेताला भेट देणे (परिसर ओळख) | क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती-2 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव: परिसरातील शेताला भेट देणे (परिसर ओळख)
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक परिसरातील शेतीबाबत माहिती गोळा करतात.
शिक्षक परिसरात उपलब्ध शेतीला कुठे व केव्हा, कशी भेट दयायची याचे नियोजन करतात. संबंधित व्यक्तींना व पालकांना याची पूर्वकल्पना देतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन होण्यासाठी सूचना देतात. विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सूचना देतात. उदा. पाण्याची बाटली ठेवणे, रांगेत चालणे इत्यादी सूचना.
शिक्षक विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी दरम्यान कोणत्या बाबींची माहिती घ्यावी किंवा निरीक्षण करावे याबाबत सविस्तर पूर्वसूचना देतात. खालील प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करण्यास सांगतात.
प्रश्न:
१) शेत कोणाचे आहे?
२) शेतात कोण काम करतात?
३) शेताला पाणी कोठून मिळते?
४) शेतात कोणकोणती पिके घेतात ?
५) शेतीसाठी कोणकोणती अवजारे लागतात? इत्यादी
क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विदद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारे (प्रश्नोत्तरे, गप्पागोष्टी) चर्चा करणार हे ठरवतात.
विकसित होणारी कौशल्ये निरीक्षण, संप्रेषण, सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक कौशल्ये, सहकार्य इ. आवश्यक साहित्य : पाण्याची बाटली, डबा इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील शेतीची माहिती विचारतात.
२) परिसरातील शेतीला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भातं सूचना देतात. (उदा., एका रांगेत चला, स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी.)
३) शिक्षक विदयार्थ्यांना परिसरातील क्षेत्रभेटीवेळी पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात,
४) क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील स्वरूपाची प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात.
प्रश्न :
१) शेतावर जाण्याचा रस्ता कसा होता?
२) शेतकऱ्याचा पोशाख कसा होता.
३) शेतात कोणकोणती पिके होती?
४) तेथे झाडे होती का? कोणकोणती झाडे होती?
५) शेतातील पिकांना पाणी कोठून देत होते?
६) शेतीला भेट देऊन तुम्हाला कसे वाटले, काय अनुभव आले. इत्यादी
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी परिसरातील शेतीची माहिती सांगतात.
२) विद्यार्थी क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात.
३) विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या ठिकाण/स्थळ याची माहिती सादर करतात.
४) विद्यार्थी क्षेत्रभेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
अशा प्रकारे बाजार/गोठा/दूध डेअरी/बाग इत्यादी स्थळांना क्षेत्रभेट देता येईल.