उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : स्वसंरक्षण प्रात्यक्षिक व व्याख्यान
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक स्वसंरक्षणावर आधारित माहिती, व्हिडिओ यांचे संकलन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: धैर्य, साहस, दूरदृष्टी, हस्त व नेत्र समन्वय, आत्मविश्वास.
आवश्यक साहित्य : चित्रे, व्हिडिओ क्लिप.
शिक्षक कृती: पूर्वनियोजनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणावर गोळा करण्यासाठी माहिती विचारतात. जसे :
१) स्वसंरक्षण म्हणजे काय ? (उत्तर: स्वतःचे, एखाद्याच्या मालमत्तेचे किंवा एखाद्याच्या गटाचे रक्षण करण्याची कृती म्हणजे स्वसंरक्षण होय.)
२) स्वसंरक्षणासाठी कोणकोणते उपक्रम घेतले जातात? (उत्तर: ज्युडो, कराटे, बॉक्सिंग, तायक्वांदो इत्यादी.) शिक्षक विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण म्हणजे काय? दक्षता, स्वसंरक्षण तंत्र यांविषयी व्याख्यान व प्रात्यक्षिकाच्या आधारे समजावतात.
१) स्वसंरक्षण : स्वसंरक्षण हा एक प्रतिकारक उपाय आहे ज्यामध्ये स्वतःचे आरोग्य आणि कल्याण हानीपासून बचाव करणे समाविष्ट आहे. धोक्याच्या वेळी बळाचा वापर करण्याचे कायदेशीर औचित्य म्हणून स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर अनेक अधिकारक्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. स्वसंरक्षण म्हणजे हिंसाचाराच्या तात्काळ धोक्याचा सामना करण्यासाठी शारीरिक शक्तीचा वापर करणे होय. अशी शक्ती सशस्त्र किंवा निःशस्त्र असू शकते. दोन्ही बाबतीत, यशाची शक्यता विविध निकषांवर अवलंबून असते, एकीकडे धोक्याच्या तीव्रतेशी संबंधित, परंतु बचावकर्त्याच्या मानसिक आणि शारीरिक तयारीवर देखील.
शालेय वयात अथवा नंतरही स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिल्यास ते संकटात उपयोग ठरते. शारीरिक अत्याचार फक्त स्त्रियांवर होतात असे नाही, तर मुलांवर देखील होऊ शकतात, म्हणून शालेय वयातच मुलामुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दयावे व त्यांनी प्रशिक्षणातील डावपेचांचा सराव करावा. खरे स्वसंरक्षण प्रत्यक्ष शारीरिक झटापटीच्या कितीतरी आधीपासूनच सुरू होते. त्यामुळे संभाव्य संकट ओळखण्याइतके सावध असावे.
अत्यंत ठामपणे शाब्दिक किंवा देहबोली सारख्या माध्यमांचा वापर करणे.
संरक्षणात्मक रणनीतींचा अवलंब करून संकट टाळणे अथवा त्याची तीव्रता खूप कमी करणे.
आणि केवळ अंतिम उपाय म्हणूनच प्रत्यक्ष शरीरबळाचा वापर करणे.
ही स्वसंरक्षणाची तीन मूलतत्त्वे आहेत. या तीन मूलतत्त्वांच्या साहाय्याने प्रभावीपणे प्रतिबंध करता येतो. स्वसंरक्षण करताना धोका ओळखणे, धोक्याची तीव्रता कमी करणे व प्रतिहल्ला करणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
२) स्वरक्षणाच्या वेळी घ्यावयाची दक्षता दररोज घराबाहेर जावे लागत असल्यामुळे स्वतःच्या बाबतीत पुढीलप्रमाणे काळजी घेतल्यास स्वसंरक्षण करण्यासाठी सक्षम होण्यास मदत होईल. संकट आल्यावर प्रतिकार करण्यापेक्षा संकट येऊच नये यासाठी पुढील प्रमाणे दक्षता घेता येतील.
अ) सावधानता : कमी रहदारीचा व कमी लोकवस्तीचा रस्ता टाळावा. तेथून जाणे गरजेचे असल्यास विश्वासू व्यक्तींच्या सोबतीने जावे.
भुयारी मार्गाचा वापर करताना सावध असावे. बरोबर विश्वासू व्यक्ती असल्याशिवाय या मार्गाचा वापर करू नये.
आपली वैयक्तिक माहिती, आपला मोबाइल नंबर, घरचा फोन नंबर व पालकांचा मोबाईल नंबर तसेच घरचा पत्ता अनोळखी लोकांना देऊ नये.
गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून आपल्यातील कमतरता अनोळखी व्यक्तींना सांगू नये.
बऱ्याच मुलामुलींना प्रवासात, रस्त्यावरून चालताना इअरफोन, हेडफोन लावून संगीत ऐकण्याची किंवा मोबाइलवर बोलण्याची सवय असते. त्यात ते दंग असतात. सर्वसामान्य वाटणाऱ्या या सवयींमुळे आजूबाजूचे भान राहत नाही. चोर, गुंड व मवाली अशा मुलांचा फायदा घेतात.
शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यावर शाळेच्या आवारात किंवा वर्गामध्ये एकटे थांबू नये.
सुट्टीच्या दिवशी शाळेत कोणत्याही कारणाने बोलावले असता इतर विद्यार्थ्यांना देखील विचारून खात्री करून घ्यावी. तसेच पालकांना देखील त्याबाबत माहिती द्यावी.
शाळेत किंवा कुठेही जाताना अनोळखी व्यक्तीच्या (स्त्री अथवा पुरुष) गाडीतून जाण्याचे टाळावे.
• एखाद्या वेळी जवळचे नातेवाईक, आई अथवा वडिलांचे आजारपण, दवाखाना, अपघात यांसारखी कारणे सांगून नेण्यासाठी शाळा, महाविद्यालय अथवा घरी अचानक अपरिचित व्यक्ती येतात, अशा वेळी त्या प्रसंगाची खात्रीशीर माहिती घेऊन ओळखीच्या व खात्रीच्या व्यक्तीला सोबत घेऊन जावे. अनोळखी व्यक्तीबरोबर कुठल्याही परिस्थितीत एकटे जाऊ नये.
ब) पूर्वसूचना: बरेचदा संकटाची चाहूल समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरून, शारीरिक हालचालींवरून लागते किंवा आंतरिक सूचना मिळते अशा वेळी जास्त सावधगिरी बाळगावी.
गर्दीच्या वेळी जर कोणी शारीरिक जवळीक करत असेल तर, त्याच वेळी आसपासच्या लोकांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने स्पष्ट बोलून विरोध करावा.
वाईट हेतूने त्रास देणारे लोक जर पाठलाग करणे, जवळ यायचा प्रयत्न करणे, पकडण्याचा प्रयत्न करणे, जवळीक साधण्यासाठी पत्ता विचारणे किंवा रस्ता विचारणे, सतत अवाजवी खुशामत किंवा स्तुती करणे, सतत मदत करण्याची संधी शोधणे, महाग व चैनीच्या वस्तू भेट देण्याचे आमिष दाखवणे, हॉटेलमध्ये नेणे, चित्रपटगृहात नेणे, मॉलमध्ये खरेदीसाठी नेणे, मोटरसायकल अथवा कारमधून दूरवर फिरायला नेणे व अधिकारी असल्याची बतावणी करून एकटे बाजूला घेऊन जाणे अशा कोणत्याही प्रकारे वागत असतील, तर ही अत्याचाराची पूर्वसूचना समजून सावध व्हावे.
आपल्या येण्या-जाण्याच्या मार्गात कोणी पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यास सावध व्हावे व पालकांना याबाबत माहिती दयावी.
क) देहबोली: माणसाच्या देहबोलीवरून नजरेवरून, त्याच्या मनातले भाव समजू शकतात. अत्याचार करणाऱ्या माणसाची नजर व हालचालींचा अंदाज घ्यावा व सतर्क रहावे. मुलांनी नेहमी विचारांच्या तंत्रेत हरवून निष्काळजीपणे न चालता निर्भयपणे पण तितकेच सावधपणे चालावे. हल्ला कोठूनही होऊ शकतो. मात्र चालण्यात निर्भयता आणि आत्मविश्वास दिसला तर, सहसा कोणीही वाटेला जाण्याचे धाडस करत नाही. स्वसंरक्षणासाठी शारीरिक ताकद महत्त्वाची असतेच; पण मानसिक स्वास्थ हे तितकेच महत्त्वाचे असते. निर्णयक्षमता, दृढता, आत्मविश्वास यांचाही वाटा शारीरिक व मानसिक सुदृढते इतकाच महत्त्वाचा असतो. त्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
आत्मविश्वास न गमवता संकटाला धैर्याने तोंड दयावे.
मुलींनीदेखील उद्युक्त करणारी वेशभूषा व वर्तन टाळावे.
मुले व मुली दोघांनीही नेहमी सावध असावे.
अचानक हल्ला, जबरदस्ती झाल्यास प्रसंगावधान ठेवावे. वेळ व प्रसंग पाहून शक्ती अथवा युक्तीचा वापर करावा.
ड) शारीरिक सक्षमता शारीरिक सक्षमता असणे ही मूलभूत बाब आहे व अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी ती गरजेची आहे. संकटसमयी गर्भगळीत झाले तर कोणीही संरक्षण करू शकणार नाही. जर मन कणखर असेल तर आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूच्या वस्तू, आपल्या जवळील वस्तू तसेच शरीराचे वेगवेगळे अवयव उदाहरणार्थ आपले डोके, कपाळ, हातांची बोटे, नखे, मूठ, तळहात, कोपर, गुडघे व पायांच्या टाचा यांचा उपयोग परिस्थितीनुसार स्वसंरक्षणासाठी करता येतो. हा उपयोग करताना मनगट बोटे वाकवून स्वसंरक्षण करता येते.
३) स्वसंरक्षण तंत्र : स्वसंरक्षणाच्या तंत्राकडे आक्रमणाची सज्जता म्हणून न पाहता अंगचटीला येऊन
हल्लेखोरांच्या संभाव्य हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याची पूर्वतयारी म्हणून पाहिले पाहिजे.
४) स्वसंरक्षणाच्या पद्धती : (खालील स्वसंरक्षणाच्या पद्धतीचे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करून दाखवतील व विद्यार्थ्यांकडून ही प्रात्यक्षिक करून घेतील.)
वार करणे.
वार अडवणे.
प्रतिस्पर्ध्यावर ताबा मिळविणे.
सुरक्षित पद्धतीने खाली पडणे.
विद्यार्थी कृती :
१) स्वसंरक्षणावर पूर्वनियोजनानुसार ठरविलेल्या घटकांवर आधारित माहितीचे संकलन करून शिक्षकांना सांगतात.
२) विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेली स्वसंरक्षण, दक्षता व स्वसंरक्षणाची तंत्रे याविषयीची माहिती काळजीपूर्वक श्रवण करतात व प्रत्यक्ष कृतीत सहभागी होतात.
३) शिक्षकांनी स्वसंरक्षणाच्या पद्धतीचे दाखविलेल्या प्रात्यक्षिकाप्रमाणे विदयार्थी स्वतः प्रत्यक्ष कृती करतील.
संदर्भ साहित्य :
१) स्वसंरक्षण मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
२) स्वसंरक्षणावर आधारित उपक्रम ज्युडो या खेळाची लिंक.
1) https://youtu.be/LyqgUwQCxIQ?feature=shared