एक दिवस व्यावसायिकासंगे | व्यक्तिमत्त्व विकास-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : एक दिवस व्यावसायिकासंगे
पूर्वनियोजन कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांना खालील आपल्या परिसरातील विविध व्यवसाय व व्यावसायिकांची माहिती देतात. परिसरातील कोणत्याही एका व्यावसायिकासोबत एक दिवस राहून त्याचे संपूर्ण कार्य व दिनक्रम समजून घेण्याबाबत सांगतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- आर्थिक साक्षरता, समानानुभूती, व्यावसायिक कौशल्यांची
माहिती, विश्लेषण, मत मांडणे, निरीक्षण, संप्रेषण
आवश्यक साहित्य : वही, पेन.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील विविध व्यवसाय, परिचित व्यावसायिक उदा. किराणा दुकानदार,
भाजी विक्रेता, फळ विक्रेता, मोबाइल दुकानदार इत्यादींची माहिती गोळा करण्यास सांगतात.
२) परिसरातील कोणत्याही एका व्यवसायिकासोबत त्यांची परवानगी घेऊन किमान २ तास त्यांच्या सोबत व्यतित करण्यास सांगतात.
३) सदर कालावधीत स्वतःच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्याविषयी अवगत करतात.
४) सदर कालावधीत त्यांच्या कामाचे निरीक्षण करून पुढील बाबींच्या नोंदी घेण्याबाबत सांगतात.
उदा. व्यवहार कसे होतात, काय-काय तयारी करावी लागते, कामाचे स्वरूप, दैनंदिन कमाई, मालाची/ सामानांची मांडणी, व्यवस्था इत्यादी.
५) सदर कृती सुट्टीच्या दिवशी करून त्याविषयी अनुभवांचे सादरीकरण, चर्चा 'आनंददायी शनिवार' च्या नियोजित वेळी घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी त्यांच्या परिसरातील विविध व्यवसाय, परिचित व्यावसायिक उदा., किराणा दुकानदार, भाजी विक्रेता, मोबाइल दुकानदार इत्यादींची माहिती गोळा करतात.
२) परिसरातील विविध व्यावसायिकांबाबत उपक्रम घेण्याबाबत पूर्वपरवानगी व चर्चा करतात.
३) नेमून दिलेल्या कालावधीमध्ये सदर उपक्रम पूर्ण करतात.
४) उपक्रमादरम्यान येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय, आर्थिक उलाढाल, नफा-तोटा यांविषयी संबधित व्यावसायिक यांचेशी चर्चा करून नोंदी करतात.
५) 'आनंददायी शनिवार' या दिवशी सादरीकरण व चर्चा करतात.
संदर्भ साहित्य :
१) विविध व्यावसायिकांची माहिती.
टीप : मोठ्या स्वरूपात सदर उपक्रम विद्यार्थ्यांचे गट करून घेता येईल.