सुरपारंब्या | पारंपरिक खेळ-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : सुरपारंब्या
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक सुरपारंब्या खेळाशी संबंधित माहितीचे संकलन करतात.
सुरपारंब्या या पारंपरिक खेळाविषयी माहिती विद्यार्थ्यास गोळा करण्यास सांगतात व त्याविषयी घटक ठरवून देतात.
सुरपारंब्या हा खेळ भारताव्यतिरिक्त अजून कोणत्या देशात खेळला जातो? सुरपारंब्या म्हणजे काय ? हा खेळ खेळण्यासाठी कोणते साहित्य आवश्यक आहे. पाठलाग करणे व बचाव करणे म्हणजे काय ? या अनुषंगाने शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती देतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : चपळता, युक्तीशक्ती, पायांची व हातांची वेगवान हालचाल, नेत्र
समन्वय, शरीर निर्व्यसनी, चाणाक्ष व्यक्ती, कौशल्य विकास, नागमोडी धावणे, हुलकावणी देणे, जलद धावणे, चकवा देणे, प्रतिस्पध्र्थ्यांची ताकद, वेग आजमावणे.
आवश्यक साहित्य : बांबूची किंवा इतर फांदीची दोन फूट लांबीची छोटी काठी, वर्तुळाकार रिंगण आखण्यासाठी
पांढरी भुकटी किंवा चुना.
शिक्षक कृती :
१) सुरपारंब्या हा खेळ खेळण्यासाठी वडाचे झाड किंवा इतर झाडे जेथे आहेत तेथे मोठ्या झाडाच्या खाली मातीचे मैदान तयार करून घेतात.
२) सुरपारंब्या या पारंपरिक खेळाविषयी माहिती विद्यार्थ्यांना विचारतात.
३) सुरपारंब्या खेळ व खेळाचे नियम या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देतात.
४) सुरपारंब्या हा खेळ खेळताना पाळावयाच्या सुरक्षित नियमासंदर्भात विद्यार्थ्यांना जाणीव करून देतात.
५) हा खेळ खेळण्यासाठी पाच ते सात विद्यार्थ्यांचा एकच गट तयार करतात व एकावर डाव किंवा राज्य असते.
६) सुरपारंब्या हा खेळ कसा खेळावा ? हे विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे समजवतात.
७) गटांतील एका विदयार्थ्याने खाली राहून सुरकाठी जोरात पाया खालून दूरवर फेकायची. बाकीचे सर्व मुले झाडावर चढलेली असतील. ज्या विद्यार्थ्यांवर राज्य आहे, त्याने धावत जाऊन ती काठी आणून वर्तुळाकार रिंगणामध्ये ठेवायची व लगेच पाठलाव करत झाडावर चढून त्या विद्यार्थ्यांना स्पर्श करायचा ज्या विद्यार्थ्याला हाताने स्पर्श होतो त्या विद्यार्थ्यांवर राज्य होते.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी सुरपारंब्या या खेळाविषयी संकलित केलेली माहिती सांगतात.
२) शिक्षकांनी खेळ खेळताना पाळावयाच्या सुरक्षिततेच्या नियमांविषयी माहितीचे काळजीपूर्वक श्रवण करतात.
३) सूरपारंब्या हा खेळ व त्याच्या नियमांविषयी शिक्षकांनी सांगितलेली माहिती लक्षपूर्वक ऐकतात. कृती
समजून घेतात.
४) हा खेळ खेळण्यासाठी सहा ते सात विद्यार्थ्यांचा एक गट तयार करतात व एका विद्यार्थ्यांवर डाव किंवा राज्य असते.
५) प्रत्यक्ष खेळ कसा खेळायचा याविषयी शिक्षकांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकांचे सर्व विद्यार्थी शिक्षकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून हा खेळ खेळतात.
संदर्भ :
१) कौशल्यविकास आणि मनोरंजक खेळ, एटीएम पब्लिकेशन.
२) जीवन शिक्षण अंकांमधील लेख, पारंपरिक खेळ
३) शारीरिक शिक्षण हस्तपुस्तिका
४) विविध खेळ भारतीय विचार, साधना प्रकाशन, पुणे.
५) ट्रॅडिशनल इंडियन गेम, श्री आकाश सोनार.