मातकाम रोली, गोली, पोली | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-उपक्रम 3 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रमाचे नाव : मातकाम रोली, गोली, पोली
पूर्वनियोजित कृती :
• माती चाळून भिजवून ठेवतात, विदयार्थ्यांसोबत हात पुसण्यासाठी कापड, वस्तू तयार करताना आधार म्हणून पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी घेण्यासाठी छोटे भांडे आणायला सांगतात.
विकसित होणारी कौशल्ये सर्जनशीलता, कारककौशल्य, सौंदर्यदृष्टी
आवश्यक साहित्य : ओली माती, पाण्यासाठी भांडे, जुने कापड, पुठ्ठ्याचा तुकडा
शिक्षक कृती :
१) शिक्षक अगोदरच्या दिवशी माती चाळून घेतात. योग्य प्रमाणात पाणी घालून भिजवून ठेवतात.
२) दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात. पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी भरलेले भांडे समोर ठेवायला सांगतात.
३) सर्वांना प्रमाणात मातीचा गोळा वाटप करतात. शिक्षक माती हाताळण्याच्या सूचना देऊन स्वतः मातीचा छोटा गोळा घेऊन रोली (मातीची वळी) तयार करून दाखवतात. या ओल्या मातीच्या वळीला 'रोली' म्हणावे असे सांगतात.
४) आणखी मातीचा एक छोटा गोळा घेऊन दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये अलगद फिरवून गोल आकार देतात. त्याला 'गोली' म्हणावे असे सांगतात.
५) आणखी मातीचा एक छोटा गोळा घेऊन दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये दाबून चपटा, गोल आकार तयार करून दाखवतात, त्या मातीच्या आकाराला 'पोली' म्हणावे असे सांगतात.
६) आपण आताच मातीपासून कोणकोणते आकार तयार केले? सांगा बरे असे विचारतात. विद्यार्थ्यांना मातीचे छोटे गोळे घेऊन रोली, गोली, पोली असे आकार तयार करायला सांगतात.
७) तयार झालेले आकार गुळगुळीत करण्यासाठी वापर पाण्याचा करून दाखवतात.
८) ५ गोळ्यांचे आकार जोडून फुलाचा आकार तयार करून दाखवतात. फुलाच्या मधोमध गोळीचा आकार जोडतात. फुलाचा देठ म्हणून रोली जोडतात. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे पुठ्ठ्याच्या तुकड्यावर फूल तयार करायला सांगतात.
विदयार्थी कृती :
१) विद्यार्थी पुठ्ठ्याचा तुकडा आणि पाण्याच्या भांड्यासह गोलाकार बसतात. शिक्षकांनी मातीपासून तयार केलेल्या रोली, गोली, पोली या आकार आणि कृतीचे निरीक्षण करतात.
२) मातीचे आकार गुळगुळीत करण्यासाठी पाण्याचा वापर समजून घेतात.
३) मातीच्या दिलेल्या गोळ्यातून माती घेत रोली, गोली, पोली असे आकार तयार करतात.
४) रोली, गोली पोली या मातीच्या आकारांपासून पुठ्ठ्याच्या तुकड्यावर आवडते फूल तयार करतात. जुन्या कापडाच्या तुकड्याने मातीने भरलेले हात, भांडे, जागा स्वच्छ करतात.