कागदकाम व पुठ्ठाकाम कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-3 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : कागदकाम व पुठ्ठाकाम कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे.
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने मेथी पावडर/डिंक वापरून कागदाचा लगदा तयार करतात.
विद्यार्थी बैठक व्यवस्था, तयार झालेल्या वस्तू वाळवण्यासाठी जागेची व्यवस्था करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याचा तुकडा, रंग, ब्रश, जुने कापड, तार, दोरा, मोजपट्टी, डिंक, कटर, कात्री इत्यादी साहित्य बरोबर आणायला सांगतात.
विद्यार्थ्यांकडून कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करून घेतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : सर्जनशील विचार, नवनिर्मिती, पुनर्वापर.
आवश्यक साहित्य : वर्तमानपत्राचे जुने कागदापासून मेथी पावडर/डिंक वापरून तयार केलेला कागदाचा लगदा, रंगीत कागदाचे तुकडे, टॅल्कम पावडर, विविध प्रकारचे रंग, ब्रश, दोरा, तार, पाणी, मोजपट्टट्टी, डिंक, कटर, कात्री, इत्यादी.
शिक्षक कृती :
१) आदल्या दिवशी कागदाचा लगदा कसा तयार करतात याची माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या मदतीने लगदा तयार करून घेतात किंवा संबंधित व्हिडिओ दाखवतात. (ज्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून वस्तू तयार केलेल्या आहेत.) विद्यार्थ्यांना सर्व कृतींचे निरीक्षण करण्यास सांगतात.
२) एखादी तार, काड्या घेऊन दोऱ्याने घट्ट बांधून आवडत्या वस्तूचा सांगाडा तयार करतात. उदा. प्राणी, पक्षी, फुलदाणी इत्यादी.
३) त्यावर कागदाचा लगदा हळुवार लावून आवडत्या वस्तूचा आकार तयार करतात. त्यावर डिंकाच्या साहाय्याने कोऱ्या कागदाचे तुकडे चिकटवतात. आकार आणखी रेखीव करतात. वस्तू वाळल्यानंतर त्या योग्य रंगाने रंगवतात.
४) कृती पूर्ण झाल्यावर जागा स्वच्छ करतात.
विद्यार्थी कृती :
१) अगोदरच्या दिवशी कागदाचा लगदा तयार करायला मदत करतात. संबंधित व्हिडिओ पाहतात. (ज्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून वस्तू तयार केलेल्या आहेत.) प्रथम आपल्याला जी वस्तू बनवायची आहे, त्या वस्तूचे चित्र रेखाटन किंवा प्रतिकृती समोर ठेवतात.
२) त्या वस्तूच्या आकाराप्रमाणे तार आणि दोऱ्यापासून सांगाडा तयार करतात. एकजीव झालेला कागदाचा लगदा घेऊन आपल्या समोरील चित्राप्रमाणे भाग बनवण्याचा प्रयत्न करतात.
३) योग्य पद्धतीने लगदा थापून आकार तयार करून घेतात. टॅल्कम पावडरचा उपयोग करतात. तयार झालेल्या आकारावर डिंकाच्या साहाय्याने कोरे कागद चिकटवतात.
४) प्रतिकृती तयार झाल्यानंतर वाळवतात. पूर्ण वाळल्यानंतर त्या आकाराला रंग देतात.