संग्रहालय भेट | क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती-3 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : संग्रहालय भेट
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने परिसरातील / गावातील तालुक्यातील/जिल्ह्यातील विविध संग्रहालयांची नावे, अंतर, ऐतिहासिक महत्त्व इ. बाबत माहिती गोळा करतात.
• शिक्षक यादी केलेल्या संग्रहालयापैकी कोणत्या संग्रहालयाला केव्हा भेट दयायची याचे नियोजन करतात. संबंधित व्यक्तींना व पालकांना याची पूर्वकल्पना देतात. प्रवासासाठी वाहनाची व्यवस्था करतात. दिवस वेळ निश्चित करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन होण्यासाठी सूचना देतात. विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सूचना देतात. उदा. पाण्याची बाटली घेणे, रांगेत चालणे, स्वच्छता ठेवणे, संग्रहालयात शांतता राखणे इ.
• शिक्षक क्षेत्रभेटीदरम्यान कोणत्या बाबींची माहिती घ्यावी किंवा निरीक्षण करावे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देतात.
उदा. १) संग्रहालयाचे नाव काय आहे?
२) संग्रहालय कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात आहे?
३) आपण निवडलेल्या संग्रहालयात कशाचा संग्रह आहे?
४) ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणे का आवश्यक आहे?
५) संग्रहालयातील वस्तूची काळजी कशा प्रकारे घेतली जाते?
६) या संग्रहालयातील वस्तू कोणत्या कालखंडातील आहेत ?
७) त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?
८) संग्रहालयाची वास्तू कोणाच्या अधिकारात आहे?
९) संग्रहालयाची वेळ काय असते ?
१०) संग्रहालयाच्या कामकाजाच्या सोयीसाठी बनवलेले नियम कोणते? ते योग्य आहेत का?
११) संग्रहालय पाहण्यासाठी तिकीट आहे का? असल्यास त्याची किंमत योग्य आहे का?
१२) संग्रहालयातील वस्तूंची मांडणी कशा प्रकारे केली आहे?
१३) ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारे फलक आहेत का ?
१४) संग्रहालयाची माहिती देण्यासाठी गाईड / मार्गदर्शक आहे का? इत्यादी.
क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे चर्चा करणार हे ठरवितात.
क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्याची यादी करतात, ते साहित्य सोबत घेण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना देतात.
शिक्षक क्षेत्रभेटीनंतर विद्यार्थ्यांकडून कशा प्रकारे अहवाल / प्रकल्प लेखन करून घ्यायचे हे ठरवितात. विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती निरीक्षण, संप्रेषण, सहकार्य, ऐतिहासिक वारश्याविषयी जागरूकता आवश्यक साहित्य : प्रश्नावली, पेन, वही, डबा, पाण्याची बाटली, टोपी, कॅमेरा, होकायंत्र इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील संग्रहालयांची माहिती देतात.
२) पूर्वनियोजनानुसार क्षेत्रभेटीसाठी ठरवलेल्या संग्रहालयात विद्यार्थ्यांनी कसे वागावे यासंदर्भात सूचना देतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना संग्रहालयात क्षेत्रभेटीसाठी घेऊन जातात.
४) पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात. आवश्यक तेथे व शक्य असल्यास फोटो घ्यायला सांगतात.
५) शिक्षक क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात, मदत करतात
६) क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांशी चर्चा करतात.
उदा. १) आपण भेट दिलेल्या संग्रहालयात कोणत्या वस्तुंचा संग्रह होता?
२) तुम्हांला संग्रहालय कसे वाटले ?
३) यापूर्वी तुम्ही कोणत्या संग्रहालयाला भेट दिली आहे का?
४) तुम्हांला स्वतःला कोणत्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो ? का?
५) संग्रहालयात आणखी कोणत्या वस्तूंची भर घालता येईल?
६) संग्रहालयाची आवश्यकता का आहे? इत्यादी.
७) तुमचा अनुभव कसा होता? इत्यादी
७) क्षेत्रभेटीचे ठिकाण, अंतर, लागलेला वेळ, संकलित माहिती व समारोप याप्रमाणे अहवाल लेखन करून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी संग्रहालयांची यादी तयार करतात.
२) विद्यार्थी क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व प्रश्नावलीच्या साहाय्याने आवश्यक माहिती संकलित करतात. शंका व प्रश्न विचारतात.
३) आवश्यक तेथे व शक्य असल्यास फोटो घेतात.
४) शिस्त व सुरक्षेचे नियम पाळून क्षेत्रभेट पूर्ण करतात.
५) विदयार्थी क्षेत्रभेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
६) दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अहवाल / प्रकल्प लेखन करतात. शक्य झाल्यास फोटो जोडतात.