आकारांची सजावट रंगीत बोळ्यांनी (चिकटकाम) | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-उपक्रम 4 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक: ४
उपक्रमाचे नाव: आकारांची सजावट रंगीत बोळ्यांनी (चिकटकाम)
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करतात. विद्यार्थ्यांना सोबत रंगीत कागद /घोटीव कागद, मोजपट्टी, जुने कापड आणायला सांगतात. केवळ काळ्या रंगात बाह्यरेषा असलेली चित्रे जमा करून ठेवतात. चित्र वाटप, परिसर स्वच्छता आणि चित्र प्रदर्शित करण्याचे नियोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये सर्जनशीलता, नवनिर्मिती, संघभावना
आवश्यक साहित्य: रंगीत कागद /घोटीव कागद, मोजपट्टी, जुने कापड, केवळ काळ्या रंगात बाह्यरेषा असलेली चित्रे इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक ४-४ विद्यार्थ्यांचे गट तयार करतात.
२) प्रत्येक गटाला स्वतंत्र गोलाकार आकारात बसवतात. विद्यार्थ्यांनी चित्र सजावट कामाचे आपापसात वाटप करण्याला सुचवतात. प्रत्येक गटाला काळ्या रंगात बाह्यरेषा असलेले चित्र वाटप करतात.
३) विद्यार्थ्यांनी आणलेल्या रंगीत कागद अथवा घोटीव कागदाचे लहान लहान गोल बोळे करायला सांगतात. गटातील काही विद्यार्थ्यांना चित्राच्या बाह्यरेषेच्या आत डिंकाने रंगीत बोळे चिकटवायला सांगतात. पूर्ण झालेली चित्रे प्रदर्शित करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांनी सुचवल्याप्रमाणे गटागटाने गोलाकार आकारात बसतात बोळे तयार करणे, बोळे रिकाम्या आकारात चिकटवणे अशी कामे आपापसात वाटून घेतात.
२) पुरवलेल्या केवळ काळ्या रंगात बाह्यरेषा असलेल्या रिकाम्या चित्रात रंगीत बोळे डिंकाने त्यांच्या आवडीप्रमाणे चिकटवून सजावट करतात.
३) तयार झालेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी शिक्षकांना मदत करतात.