स्वयंपूर्ण गाव याबाबत माहिती (अलुतेदार, बलुतेदार) | विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन-4 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ४
उपक्रम : स्वयंपूर्ण गाव याबाबत माहिती (अलुतेदार, बलुतेदार)
पूर्वनियोजित कृती :
• ग्रामीण संस्कृती उद्यानास भेट.
नियोजित कृती / पूर्वनियोजन :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काळी गावांमध्ये कसा व्यवसाय चालायचा, गावे स्वयंपूर्ण कशी होती या बाबत माहिती देण्यासाठी अलुतेदार व बलुतेदार या संकल्पनेबाबत माहिती गोळा करतात.
२) बलुतेदारमध्ये कोणते १२ व्यवसाय येतात जे शेतकऱ्याच्या महत्त्वाच्या गरजा भागवत असत त्या बद्दल माहिती गोळा करतात.
(उदा. सोनार, कुंभार, सुतार, लोहार, न्हावी, परिट, चांभार, तेली, शिंपी, गवंडी, विणकर आणि गुख)
३) अलुतेदार म्हणजे जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा पुरवत त्याबाबत इंटरनेटवरून माहिती घेतात.
४) अलुतेदार, बलुतेदार यांचे राहणीमान, घर कसे असायचे, ते कशाचा व्यवसाय करायचे याबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी संस्कृती उदयानास भेटीचे नियोजन करतात.
५) विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उद्यान भेटीसाठी मुख्याध्यापकांसोबत ठरवून इतर विषय शिक्षकांचेही क्षेत्रभेटीस नेण्यासाठी सहकार्य मिळण्याबाबत नियोजन करतात.
६) विद्यार्थ्यांच्या पालकांची परवानगी घेतात.
७) शिक्षक विद्यार्थ्यांशी चर्चा करून माहिती घेण्याचे घटक ठरवतात.
व्यावसायिकाला कोणते विशेष नाव आहे?
व्यावसायिक कोणता व्यवसाय करताना दिसतो ?
व्यवसायासाठी कोणती अवजारे वापरली आहेत
व्यावसायिकाचा पेहराव कोणता आहे?
आजच्या काळात या व्यवसायात झालेला बदल
८) शिक्षक भेटीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यासाठी नियम सांगतात.
कोणत्याही वस्तूला हात लावू नये.
• मुर्ती व शिल्पापासून योग्य त्या अंतरावर राहावे.
अनावश्यक गर्दी टाळावी.
• शिल्पा भोवतीच्या कुंपणातून आत जाऊ नये.
विकसित होणारी कौशल्य / फलनिष्पत्ती- निरीक्षण, सहयोग कौशल्य, प्रश्न कौशल्य, माहिती संकलन व सादरीकरण, व्यावहारिक कौशल्य
आवश्यक साहित्य : वही, पेन, पाणी बॉटल, प्रथमोपचार पेटी इ.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना संस्कृती उदयनात घेऊन जातात.
२) प्रत्येक शिल्पाचे निरीक्षण करून तेथे लिहिलेल्या माहितीचे वाचन करून नोंदी घेण्यास सांगतात. तसेच त्याबाबतची अधिकची माहिती सांगतात.
३) विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांचे पालन करण्यास सांगतात.
४) विद्यार्थ्यांना त्यांना दिलेल्या घटकाबाबत अधिक माहिती घेऊन पुढच्या वेळी एका व्यावसायिकाच्या व्यवसायासंबंधी प्रत्यक्ष भेटीत घेतलेली माहिती व आजच्या काळात त्यात झालेला बदल याबद्दल उपलब्ध वेळेत (किमान ५ विद्यार्थ्यांच्या) गटात सादरीकरण करण्यास सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी सुरक्षा नियमांचे पालन करतात दिलेल्या घटकानुसार शिल्पाचे निरीक्षण करतात व दिलेल्या माहितीचे वाचन करतात, समजून घेतात व टिपणे घेतात.
२) उदा. व्यावसायिकाचे नाव - कुंभार
३) व्यवसाय - मातीच्या मूर्त्या, भांडी बनविणे व विकणे.
४) अवजारे व साहित्य माती, चाक (लेथ), पाणी, आवा, गंडा, चोपणे, बांबूचा दांडा, मण्यांची माळ, साचे इत्यादी पेहराव - पुरुष धोतर, स्त्रिया नऊवारी साडी.
५) विद्यार्थी इंटरनेटच्या साहाय्याने त्यांना दिलेल्या घटकासंबंधात अधिक माहिती गोळा करतात व आताच्या परिस्थितीत झालेल्या बदलाबाबत सादरीकरण करतात.
संदर्भ :
१) विकिपीडिया,
२) गावचे अलुतेदार आणि बलुतेदार लेखक: शंकरराव खरात.