त्रिमित दृश्य निर्मिती शेती | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-4 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ४
उपक्रमाचे नाव : त्रिमित दृश्य निर्मिती शेती
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांना घर अथवा झोपडी, झाडे, सायकल, नांगरणी करणारे शेतकरी, ट्रॅक्टर, कणसासह पिके, बाज/पलंग, कोंबड्या अशी शेतीशी संबंधित जुन्या वर्तमानपत्रातील चित्रे जमा करून आणायला सांगतात. त्याचबरोबर जुने पुठ्ठे, डिंक, कात्री, कटर आणायला सांगतात.
विद्यार्थ्यांना गटात बसता येईल अशी बैठक व्यवस्था करतात.
तयार झालेले साहित्य एकत्र मांडून एकसंध त्रिमित दृश्य रचना तयार होण्यासाठी सपाट पृष्ठभाग तयार करून ठेवतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- कलात्मक कौशल्य, संवादकौशल्य, सांघिक कार्य करण्याचे कौशल्य.
आवश्यक
साहित्य : घर अथवा झोपडी, झाडे, सायकल, नांगरणी करणारे शेतकरी, ट्रॅक्टर, कणसासह पिके, बाज/पलंग, कोंबड्या अशी शेतीशी संबंधित रंगीत चित्रे, जुने पुठ्ठे, डिंक, कात्री, कटर इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांचे गट तयार करतात. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे जमा केलेल्या रंगीत चित्रांमधून बाह्य रेषांवर कापलेली चित्रे प्रत्येक गटाला वाटतात.
२) विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली चित्रे जुन्या पुठ्ठ्यांवर डिंकाच्या साहाय्याने चिकटवायला सांगतात.
३) तयार झालेल्या प्रत्येक चित्राच्या मागे दोन-दोन काटकोन त्रिकोण आकारातील पुठ्ठे जोडतात. ज्यामुळे त्या आकृत्या सरळ सपाट पृष्ठभागावर उभ्या राहतील. क्रमवार गटांकडून तिथे टेबलवर जमा करतात.
४) एका सरळ पृष्ठभागावर एक एक करून एकसंध त्रिमित दृश्य रचना करतात. सर्व चित्रे वेगळ्या टेबलावर जमा करून विद्यार्थ्यांना स्वतः चित्रमांडणी करून, वेगळी त्रिमित दृश्य रचना करण्यासाठी प्रोत्साहित करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी आपापल्या गटात बसतात.
२) शिक्षकांनी पुरवलेली चित्रे त्यावर चिकटवून पुठ्ठा चित्रानुसार कापतात. तयार झालेल्या चित्राच्या मागे दोन काटकोन त्रिकोण चित्र व्यवस्थित उभे राहील अशा पद्धतीने चिकटवतात.
३) तयार झालेली चित्रे शिक्षकांकडे जमा करतात. शिक्षकांनी केलेल्या कृतीचे निरीक्षण करतात.
४) शिक्षकांच्या सूचनेनंतर स्वतः त्या चित्रांपासून त्रिमित दृश्य रचना करतात.