वाचू आनंदे, लिहू नेटके | वाचनसंस्कृती | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१७) वाचनसंस्कृती
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : वाचू आनंदे, लिहू नेटके
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक इयत्ता सहावी ते आठवी या स्तरानुसार पुस्तकांची निवड करतात.
या पुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या पुस्तकांचा समावेश करतात.
• कथा, कविता, चरित्र, माहिती, विज्ञान कथा, नाटिका, कार्टुन्स, वैचारिक निबंध, पत्रलेखन, ललित लेखन, प्रवासवर्णन इत्यादी पुस्तकांचा समावेश करतात.
• इयत्तानिहाय पुस्तकांचे गठ्ठे तयार करून ठेवतात .
वाचलेल्या पुस्तकाची नोंद पुढील मुद्द्यांद्वारे करतात.
१) पुस्तकाचे नाव
२) लेखकाचे नाव
३) प्रकाशक व प्रकाशन वर्ष
४) पुस्तक प्रकार
५) पृष्ठ संख्या
६) भाषाशैली
७) आशय सारांश
८) मला आवडलेल्या बाबी
९) मला न आवडलेली बाब
विकसित होणारी कौशल्य / फलनिष्पत्ती वाचनगती वाढविणे, आकलन क्षमता, लेखनकौशल्य, अभ्यासकौशल्य
(वाचून नोंद ठेवणे.)
आवश्यक साहित्य : कथा, कविता, चरित्र, माहिती, विज्ञानकथा, नाटिका, कार्टुन्स, वैचारिक निबंध, पत्रलेखन, ललितलेखन, प्रवासवर्णन इत्यादी पुस्तके, मासिके, वाचक दैनंदिनी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार पुस्तकांची निवड करतात.
उदा., सुधा मूर्ती यांनी लिहिलेले पुस्तक 'वाइज अँड अदरवाइज'
शिक्षक हे पुस्तक स्वतः वाचतात आणि पुस्तकाचे पुनरावलोकन करतात.
हे पुस्तक वाचून झाल्यावर शिक्षक वरील मुद्द्यांद्वारे लेखन करतात. उदा.
• पुस्तकाचे नाव : वाइज अँड अदरवाइज
• लेखकाचे नाव : सुधा मूर्ती
• प्रकाशक व प्रकाशन वर्ष मेहता पब्लिशिंग हाऊस, सप्टेंबर २००३
• पुस्तक प्रकार : कथा
• पृष्ठ संख्या : २०६
• भाषाशैली : समजण्यास अतिशय सोपी, रंजक
आशय सारांश :
सुधा मूर्ती यांच्या वास्तविक जीवनातील घटनांमधील ५१ कथांचा संग्रह असलेले हे नॉन फिक्शन पुस्तक आहे. सुधा मूर्ती यांनी या पुस्तकात देशभरातील लोकांबद्दल काही मार्मिक आणि डोळे उघडणाच्या कथा कथन केल्या आहेत. तसेच पुस्तकात अविश्वसनीय उदाहरणांचाही समावेश करण्यात आला आहे. हे पुस्तक २००३ मध्ये प्रकाशित झाले असून, मूळ पुस्तक हे इंग्रजी भाषेमध्ये असून त्याचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.
मला आवडलेल्या बाबी :
एकंदरीत या पुस्तकामधील कथा लहान, खुसखुशीत आणि अत्यंत वस्तुस्थितीनुसार लिहिलेल्या आहेत. ओघवत्या भाषाशैलीमुळे या कथा आपल्या अंतकरणाला भिडतात आणि विचार करायला भाग पाडतात.
मला न आवडलेली बाब :
१) या पुस्तकामधील मला न आवडलेली बाब म्हणजे, म्हाताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा यामधील म्हाताऱ्याकडून हा शब्द. या शब्दाऐवजी वृद्धाकडून असा पाहिजे होता.
२) त्यानंतर शिक्षक त्यांनी केलेल्या पुस्तकाचे पुनरावलोकन विदयार्थ्यांना वाचून दाखवतात.
३) शिक्षक त्यांनी तयार केलेल्या गठ्ठ्यांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचायला सांगतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकाचे वरील मुद्द्यांच्या आधारे पुनरावलोकन करायला
सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांनी केलेल्या पुस्तकाचे पुनरावलोकन लक्षपूर्वक ऐकतात.
२) विद्यार्थी त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचतात.
३) वाचलेल्या पुस्तकाचे विद्यार्थी पुनरावलोकन वरील मुद्द्यांच्या आधारे Readers Diary मध्ये लिहून काढतात.
४) त्यानंतर विद्यार्थी हे पुनरावलोकनाचे प्रकटवाचन करतात.
(शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तक पुनरावलोकन ही कृती वर्षभर चालू ठेवायला सांगतात.)
संदर्भ साहित्यः
1) https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/01/04/review-shyamchi-aai-marathi-book/
2) https://www.insidemarathibooks.in/index.php/2022/10/07/jangalchi-duniya-marathi-book-review/
3) https://www.insidemarathibooks.in/index.php/2022/06/28/jangalach-den-marathi-book-review/
4) https://www.insidemarathibooks.in/index.php/2021/05/28/agnipankh-marathi-book-review/
5) https://www.insidemarathibooks.in/index.php/2020/04/11/bhokarwadichya-goshti-marathi-book-review/