नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य | समता | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१०) समता
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य.
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांना शनिवारच्या आनंददायी तासिकेसाठी शुक्रवारी शेवटच्या तासिकेत मुलांना सूचना देतात.
• शाळेची वनभोजनासाठी गावातील द्राक्ष बागायतीला भेट देऊन वनभोजनासाठी गावातीलच ठिबकसिंचन सेंद्रियशेती, उसाचे गुन्हाळ, गुलाबाची बाग, हुरडा पार्टी, ग्रीन हाऊस, शेततळे, ग्रीन प्लांटपैकी शेतीला भेट देण्यासाठी जाणार आहोत यासाठी मुलांना सूचित करतात.
• आपापल्या घरून डबा घेऊन येण्याची सूचना करतात. वनभोजनासाठी लागणारे साहित्य सोबत ठेवायला सांगतात.
• आपण वनभोजनासाठी कुठे जाणार आहोत याची आपल्या पालकांना पूर्वकल्पना देतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती :
१) नातेसंबंधाचा विकास
२) वैज्ञानिक दृष्टिकोन
३) भौगोलिक व पर्यावरणीय दृष्टिकोन
४) संवाद कौशल्याचा विकास
५) अचूक निरीक्षणे टिपली
६) आत्मविश्वास वाढला
७) सहकार्यवृत्तीचा विकास
८) सर्जनशीलतेचा विकास
९) साहित्यिक दृष्टिकोनाचा आनंद
आवश्यक साहित्य : डबा, पाण्याची बॉटल, टोपी, शूज, नोंदवही, आसन पट्टी, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना परिपाठातच वनभोजनाला जाण्यासाठी सर्व सूचना देतात.
२) मुले वनभोजनासाठी लागणारे साहित्य घेऊन आलेत याची खात्री करून घेतात.
३) विद्यार्थी संख्येनुसार गट तयार करून एक गटप्रमुख नेमतात.
४) वनभोजनादरम्यान शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार नाही याची सूचना देतात.
५) मुलांना भौगोलिक, पर्यावरणीय, कृषी, सौंदर्यात्मक, नैसर्गिक, जलव्यवस्थापन, जलस्रोत, कौशल्याधिष्ठित शिक्षण, प्राणीमात्राबद्दल सहानुभूती, श्रमाचे महत्त्व, शेतीचे प्रकार, या दृष्टिकोनातून निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करतात.
६) प्रथमतः वनभोजनस्थळी मुलांची बैठकव्यवस्था सुव्यवस्थित करून डबे खाण्याची सूचना देतात व डबा एकमेकांना शेअर करून खाण्याची सूचना देतात.
७) वनभोजन घेतानाचे अनुभव, प्रसंग, लिहायला सांगतात व वनभोजन स्थळी कुठल्याच प्रकारचा कचरा होणार नाही याची दक्षता घ्यायला सांगितली जाते.
८) त्यानंतर विदयार्थ्यांना सांगितलेल्या मुद्द्यांवर निरीक्षणे लिहायला सांगतात.
९) शेवटी विविध गुणदर्शनाच्या सुप्त कलागुणांना वाव म्हणून गाण्याच्या भेंड्या, डान्स, कविता, नकला हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होतो.
१०) शिक्षक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात. कोणत्या विद्यार्थ्यात कोणते गुण आहेत हे टिपतात कार्यक्रमादरम्यान वेळावेळी सूचना देतात. प्रोत्साहित करतात वनभोजनाचे अनुभव सांगायला सांगतात पण यातून काय शिकलो हे सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच्या डब्याचा मनसोक्त आस्वाद घेत घेत अनेक मित्रांच्या डब्यांमधील पदार्थांचाही आस्वाद घेतात.
२) त्याचसोबत पर्यावरणीय भौगोलिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टी, कृषी, निसर्गाचे निरीक्षण केले. त्याचसोबत पक्षी, फळे, पाने, शेती, माती, दगड, गोटे, मातीचे व पिकांचे प्रकार, पाण्याचे स्रोत अशा विविध गोष्टींची निरीक्षणे केली व टिपणेही काढली.
३) मुलांनी आनंदाने गाण्याच्या भेंड्या, डान्स, स्वलिखीत कथा-कवितांचे सादरीकरण करून स्वअभिव्यक्तीचा अनुभव घेतला आणि यामुळेच स्नेहभोजन हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण तर ठरलाच त्याच बरोबर सहकार्यवृत्ती, भौगोलिक, नैसर्गिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकासही झाला.
४) विद्यार्थ्यांच्या अनुभवातून मुले व मुलींना सादर करण्याची संधी दिल्याने त्यामध्ये मैत्रीचे संबंध परिपक्व होतात. एकमेकांबद्दल सहानुभूती, आदर, विश्वास वाढून निखळ मैत्रीचे संबंध निर्माण होतात.