जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन | २१ व्या शतकातील कौशल्ये | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
८) २१ व्या शतकातील कौशल्ये
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन
पूर्वनियोजित कृती : शुक्रवारी परिपाठात किंवा शेवटच्या तासिकेत शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना खालील सूचना
देतात :
उद्या शाळेत येताना फक्त एक वही, पेन व सोबत कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचे, कोणत्याही भाषेतील जुने एक वर्तमानपत्र अथवा त्याची काही पाने सोबत आणावीत. घरी वर्तमानपत्र येत नसेल, तर पुडी बांधून दुकानदाराने दिलेला कागद, पुस्तकाला लावलेले कव्हरसुद्धा चालेल. बाकी सूचना उदया वर्गात मिळतील. (शिक्षकांनीसुद्धा जाणीवपूर्वक काही वर्तमानपत्रे रद्दीतील निवडून आणावीत.) (गट कसे करायचे, प्रश्न किंवा कृती कोणत्या दयायच्या, वर्तमानपत्रे कोणती घ्यायची ही सर्व कामे शिक्षकांनी पूर्व नियोजनात शुक्रवारीच करावीत.).
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : चिकित्सक विचार, सर्जनशील विचार, सहयोगातून शिक्षण, संभाषण कौशल्य, सादरीकरण कौशल्य, स्वअध्ययन कृती.
आवश्यक साहित्य: वही, पेन, रद्दी वर्तमानपत्रे, मुलांनी नाही आणल्यास शिक्षकांनी पुरवठा करावीत. हे सर्व घडताना व्हिडिओ तयार करावेत व मुलांना नंतर दाखवावा. त्यातून स्वतःच्या चुका व चांगल्या बाबी दोन्ही शोधता येतील.
शिक्षक कृती :
१) शनिवारी मुले शाळेत आली, की केलेल्या नियोजनानुसार शिक्षक त्यांचे गट तयार करतात. गट करताना तिन्ही वर्गांचे मिश्र किंवा स्तरानुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार ३ ते ४ मुलांचा एक गट याप्रमाणे गट करतात. काही गट भाषा, काही इंग्रजी, काही गणित, काही परिसर अभ्यास, काही खेळ, काही इतर विषय याप्रमाणे गट करतात. शिक्षक एकेका गटास काम देतात व लघु मध्यंतरापर्यंत काम पूर्ण करून एकत्र जमण्यास सांगतात.
२) मुलांनी आणलेला जुन्या वर्तमानपत्राचा कागद वाचून काढण्यास सांगतात. त्यानंतर प्रत्येक विषयाच्या गटाने काय करायचे त्या सविस्तर सूचना खालीलप्रमाणे देतात.
कृती १ - भाषा: आपण वाचलेल्या मजकुरातून नाम, विशेषण व क्रियापदे शोधून अधोरेखित करा व लिहून काढा. किती प्रकारची विरामचिन्हे उपयोगात आणली आहेत ? (त्यांची नावे लिहा.)
कृती २ - गणित : वाचलेल्या मजकुरात आढळलेले अंक, संख्या अंकी व अक्षरी लिहून काढा. त्याचा चढता, उतरता क्रम लावा, त्याची बेरीज व वजाबाकी करा, मोठ्या संख्येला लहान संख्येने गुणाकार व भागाकार करा. काही संख्या जर दशांश अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांकात आढळल्या तर त्यांच्यावर पण त्याच क्रिया करा. तुमच्या वह्या एकमेकांना दाखवा व चूक दुरुस्त करा.
कृती ३ - परिसर अभ्यास वाचलेल्या मजकुरात पाणी, हवा, अवकाश, प्राणी, वनस्पती, सूर्यमाला, पर्यावरण याविषयी बातमी, मजकूर असेल, तर त्यावर चर्चा व चिंतन करा. त्याबद्दल तुम्हांला काय वाटते ते लिहून काढा.
कृती ४ - खेळ : वाचलेल्या मजकुरात एखादया खेळाची बातमी असल्यास त्या खेळाबद्दल चर्चा करा, अधिकची माहिती करून घ्या व त्या खेळात प्रवीण असलेल्या खेळाडूची माहिती मिळवा. खेळाचा प्रकार ओळखा व तो खेळ शिकण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही एका खेळाचे फायदे लिहून काढा.
कृती ५ - चित्रकला : ज्यांना चित्र काढायला जमते त्यांनी वर्तमानपत्रात पाहून चित्र काढा व रंगवा.
(शिक्षकांनी आपल्या कल्पकतेनुसार आणखी कृती वाढवाव्यात. त्यात विशेषण शोधा, संख्या शोधून अंकी, अक्षरी, रोमन, देवनागरी व आंतरराष्ट्रीय लिपीत लिहिणे, त्याची बेरीज, वजाबाकी इत्यादी क्रिया करणे, खेळाची बातमी शोधून खेळाविषयीची माहिती व नियम लिहिणे, पर्यावरणविषयक बातमी शोधून मी काय करावे हे लिहिणे, अपघात/भांडण/युद्ध/खटला न्याय याविषयी वाचून त्यावर आपले मत लिहिणे, जाहिरात वाचून त्यावर मत लिहिणे अशी अनेक कामे देण्यात यावीत.)
कृती ६ : सर्व कामे पूर्ण झाल्यावर एका गटाचे दुसऱ्या गटासमोर सादरीकरण व त्यावर चर्चा घेतात.
कृती ७ : चर्चेच्या वेळी शिक्षक उपस्थित राहून चर्चेला योग्य वळण देतात व योग्य निष्कर्ष मुलांना
काढायला लावतात व मग सर्व वर्गासमोर स्पष्टीकरण करतात.
कृती ८ : हे सर्व झाल्यावर वेळेप्रमाणे गट अदलाबदल करून सादरीकरण घेतात.
कृती ९ : शेवटी काही निवडक गटप्रमुखांची मते घेतात. आज आम्ही काय शिकलो, कसे शिकलो व आनंद मिळाला का?
कृती १० : शिक्षक या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ तयार करतात व नंतर दाखवतात. मुलांनी बनवल्यास उत्तमच.
कृती ११ : शेवटी शिक्षक समारोप करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी गटात बसतात. शिक्षकांच्या सूचनेनुसार कृती करतात.
२) आवश्यक तेथे चर्चा करतात व सर्वानुमते निर्णय घेतात.
३) लेखनकाम करतात.
४) मूकवाचन करतात व त्यावर आधारित कृती करतात.
५) चिंतन करतात, एकमेकांना शिकण्यात मदत करतात.
६) आवडीनुसार चित्रे काढतात, जाहिराती तयार करतात.
७) आज आपण काय शिकलो ते सांगतात व कसे शिकलो तेही सांगतात.
संदर्भ साहित्य : जुनी वर्तमानपत्रे, www.sports.com, www.plants.com, e-papers, मासिके व वर्तमानपत्रे यातील जाहिराती इत्यादी.)