चित्ररूप गोष्टींचे कथन | कथाकथन | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
१५) कथाकथन
कथाकथनाचे महत्त्व :
कथाकथन आपल्या मेंदूला उत्तेजित करते.
कथेतून केवळ माहिती घेतली जात नाही, तर भावनादेखील अनुभवता येतात.
कथेतील शब्द कल्पनाविलासासाठी मदत करतात.
शब्दसंग्रह वाढतो.
संभाषणकौशल्य विकसित होते.
नीतिमूल्ये, भावभावना यांची रुजवणूक होते.
कथाकथन जीवनाबद्दल, स्वःतबद्दल व इतरांबद्दल सहज मूल्ये शिकवते.
विविध लोकांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो.
उपक्रम क्रमांक : १
कृतीचे नाव : चित्ररूप गोष्टींचे कथन (Picture Storytelling)
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक भारतीय युक्तिकथा, परीकथा आणि पंचतंत्र मधील चित्रे गोळा करतात.
• दैनंदिन ग्रामीण/शहरी जीवनातील प्रसंगचित्रे गोळा करतात.
विकसित होणारी कौशल्ये- श्रवण, संवाद निरीक्षण व तार्किक कौशल्ये.
आवश्यक साहित्य : भारतीय युक्तिकथा, परीकथा, पंचतंत्र याबाबतची पुस्तके चित्रपट्ट्या व शब्दपट्ट्या.
शिक्षक कृती :
१) शिक्षक पंचतंत्रमधील गोष्ट निवडतात.
उदा. कासव आणि बदक
२) या गोष्टीला सुयोग्य चित्रे गोळा करतात.
३) शिक्षक सर्व चित्रे विद्यार्थ्यांना दाखवितात आणि कथाकथन करतात.
उदा. एका तळ्यात एक कासव व त्याचे दोन बदक मित्र राहत होते. बदक आणि कासव रोज गप्पागोष्टी करीत असत. एकदा दुष्काळ पडल्यामुळे तळे आटून गेले. सगळे पक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले. पण कासवाचे हाल होणार हे लक्ष्यात आल्यावर बदक खूप दुःखी होतात, शेवटी कासव बदकाला एक उपाय सुचवतो. मी एक काठी आणीन. ती मधोमध तोंडाने पकडीन. तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीने घट्ट पकडा...
४) कथा सांगताना कथेतील प्रसंग व चित्रे यांची सांगड घालून कथा मनोरंजक पद्धतीने सादर करतात.
५) शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्टीचे सादरीकरण करण्यास सांगतात. (शिक्षकांनी उपलब्ध पुस्तकांचा वापर करावा.)
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी चित्रांचे निरीक्षण करतात.
२) तसेच कथा लक्षपूर्वक ऐकतात.
३) एकेक प्रसंग ऐकताना आणि पाहताना पुढे काय होईल याबाबत उत्सुक असतात.
४) विदयार्थी चित्रांच्या साहाय्याने कथेचे सादरीकरण करतात.
संदर्भ साहित्य :
१) पंचतंत्रामधील गोष्टी
२) परीकथा
३) युक्तिकथा