चला आदर करू या | सामाजिक बांधीलकी-1 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
४) सामाजिक बांधीलकी
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव: चला आदर करू या.
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींची माहिती घेतात.
शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना शाळेतील उपक्रमाबाबत पूर्वकल्पना देतात व त्यांची शाळेच्या
उपक्रमात सहभागी होण्याबाबत परवानगी घेतात. पालकांना याबाबत पूर्वकल्पना देतात.
शिक्षक वर्गातील काही विद्यार्थ्यांकडून कुटुंबातील / परिसरातील मोठ्या व्यक्ती, लहान व्यक्ती यांची भूमिका साकार करण्याची तयारी करून घेतात.
विकसित होणारी कौशल्ये- सुसंवाद कौशल्य, प्रश्न, जीवनकौशल्य, संवेदनशीलता
शिक्षक कृती :
१) शिक्षक आदराचे महत्त्व स्पष्ट करतात. (उदा., हात जोडून नमस्कार करणे, पाणी देणे, हस्तांदोलन करणे इत्यादी.)
२) शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींना संबोधत असताना (हाक मारताना) आदर कसा व्यक्त केला जातो याबद्दल माहिती सांगतात. (उदा., दादा-ताई, काका-काकू, मामा-मामी, तात्या, छकुली, बाळा, छोटी ताई, छोटा दादा इत्यादी.)
३) शिक्षक घरातील, परिसरातील ओळखीच्या किंवा अनोळखी मोठ्या माणसांबरोबर आदराने कसे बोलावे, वागावे याबद्दल माहिती देतात.
४) शिक्षक छोट्या छोट्या कृतीतून व बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत माहिती देतात व शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आदर दिला किंवा बोललो तर तेही आपल्याला आदर देतात, बोलतात या बाबी खालील प्रश्नांच्या आधारे प्रात्यक्षिक घेऊन सांगतात.
प्रश्न -
१) दादा किंवा दीदी तुमचे नाव काय आहे?
२) काकू तुम्ही कोठे राहता?
३) मामा-मामी तुम्ही कधी आलात? पाणी घेतले का?
४) बाळा कसा आहेस तू?
५) छोटी ताई किंवा दादा शाळेत जात आहात ना !
६) काका-काकू किती दिवसांनी आलात तुम्ही?
५) शिक्षक विदद्यार्थ्यांना दिलेल्या भूमिकेनुसार गटात अभिनय करायला सांगतात.
६) शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील उपलब्ध परिचित व्यक्तींना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना माहिती दिल्याप्रमाणे उपक्रमातील कृती करायला सांगतात व कृती करून घेतात.
७) भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावलीत दिलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात.
विद्यार्थी कृती :
१) विदयार्थी छोट्या छोट्या कृतीतून व बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत शिक्षकांनी दिलेल्या सूचनेबाबतचे निरीक्षण करतात व आवश्यक ती माहिती संकलित करतात.
२) विद्यार्थी विविध पात्रे घेऊन गटात छोटे अभिनय सादर करतात.
३) विद्यार्थी प्रात्यक्षिकात सहभागी होतात.
४) विद्यार्थी प्रात्यक्षिकानंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
५) विद्यार्थी घरातील, परिसरातील ओळखीचे किंवा अनोळखी मोठ्या माणसांबरोबर आदराने बोलतात.
संदर्भ साहित्य :
मजेत शिकूया' पाठ्यपुस्तक