रद्दीतून अध्ययन | २१ व्या शतकातील कौशल्ये | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
११) २१ व्या शतकातील कौशल्ये
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव: रद्दीतून अध्ययन
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील अशी विविध भाषेतील वर्तमानपत्रांचा संग्रह करण्यासाठी सूचना देतात. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांची नावे सांगतात. उदा. लोकमत, एकमत, दैनिक सकाळ किंवा विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणारी इतर कोणतीही वर्तमानपत्रे.
शिक्षक विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे कुठे मिळतात हे सांगतात. जसे घर, शेजारी, ग्रंथालय, शाळा, किराणा दुकान इत्यादी.
शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थी आदल्या दिवशी वर्तमानपत्रांची कात्रणे संग्रहित करून ठेवतात.
शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांचे गट तयार करतात व त्या गटांना नावे देतात.
शिक्षक विद्यार्थ्यांकडून वर्तमानपत्राच्या आधारे पुढीलप्रमाणे विषयनिहाय कृती पूर्ण करण्यासाठी सूचना देतात आणि योग्य तेथे मार्गदर्शन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- सर्जनशीलता, चिकित्सक विचार, सहयोग संप्रेषण, आत्मविश्वास, करुणा.
आवश्यक साहित्य : जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी, पेन्सिल, पेन, रंग, खडू, फेव्हिकॉल,
शिक्षक कृती : शिक्षक विद्यार्थ्यांकडून विषयनिहाय कृती पूर्ण करून घेतात.
मराठी :
उदा. सांगितलेल्या अक्षरांना गोल करा.
१) सांगितलेल्या अक्षराखाली आडवी रेघ मारा.
२) सांगितलेल्या अक्षरावर तिरपी रेघ मारा.
३) सांगितलेली अक्षरे मोठ्याने वाचा.
४) आपल्या मित्रांनी वाचलेली अक्षरे लक्षपूर्वक ऐकून मोठ्याने सांगा.
५) दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी शब्द शोधा व वाचा.
६) जाड ठशातील शब्द शोधून मोठ्याने वाचा.
७) तुमच्याकडील वर्तमानपत्राचे नाव काय आहे ते सांगा.
८) तुमच्याकडे असलेल्या वर्तमानपत्रात कोणकोणती चित्रे आहेत ते सांगा.
९) वर्तमानपत्रातील गोष्ट मोठ्याने वाचा.
१०) तुमच्या घरी कोणते वर्तमानपत्र येते?
११) तुम्हाला कोणते वर्तमानपत्र वाचायला आवडते ?
१२) तुमच्या घरी वर्तमानपत्र कोण कोण वाचते?
१३) तुम्हाला माहीत असलेल्या वर्तमानपत्रांची नावे सांगा.
१४) आपल्या शाळेत कोणते वर्तमानपत्र येते?
१५) वर्तमानपत्रातील आवडलेले शब्द लिहा व मोठ्याने वाचा.
१६) आवडलेली बातमी घरी गेल्यावर आईला सांगा.
गणित :
१) वर्तमानपत्रातील जाड ठशातील शब्द मोजा.
२) जाड ठशातील शब्द मोजून किती ते सांगा.
३) तुम्हाला माहीत असलेल्या वर्तमानपत्रांची संख्या सांगा.
४) एका पानावरील चार अक्षरी / पाच अक्षरी शब्द मोजून किती आहेत ते सांगा.
५) वर्तमानपत्रात कोणकोणते आकार पाहिले ते सांगा.
६) तुमच्या घरात किती व्यक्ती वर्तमानपत्र नियमित वाचतात ते सांगा.
७) तुम्हाला आवडणाऱ्या वर्तमानपत्रांची संख्या सांगा.
८) आज तुम्ही किती बातम्या वाचल्या ते सांगा.
इंग्रजी :
१) इंग्रजी वर्तमानपत्राचे एक नाव सांगा.
२) इंग्रजी वर्तमानपत्रातील तुम्हाला माहीत असलेली मुळाक्षरे मोठ्याने वाचा.
३) इंग्रजी वर्तमानपत्रातील दोन अक्षरी, तीन अक्षरी शब्द वाचून सांगा.
४) वर्तमानपत्रातील तुम्हाला आवडलेले इंग्रजी शब्द घरी गेल्यावर तुमच्या पालकांना सांगा.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी दिलेल्या सूचनांचे पालन करतात. वर्तमानपत्राची रद्दी जमा करतात,
२) शिक्षकांनी सांगितलेल्या कृती पूर्ण करतात, तसेच शिकण्याचा व नवनिर्मितीचा आनंद घेतात.
संदर्भ साहित्य :
'अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन' प्रशिक्षण पुस्तिकेतील इयत्तानिहाय आव्हाने यादी.
१) रद्दी वर्तमानपत्र.
टीप : शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वरील कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या पुढील नावीन्यपूर्ण कृती करून घ्याव्यात.
वर्तमानपत्रातील प्राणी, पक्षी, फुले, फळे, वृक्ष यांची रंगीत चित्रे व खेळाडू, समाजसेवक, देशभक्त यांचे रंगीत फोटो संग्रहित करा.
वर्तमानपत्रातील तुमच्या शाळेच्या बातम्यांचे संकलन करा.
वर्तमानपत्रात आलेली चित्रे रंगवा.
वर्तमानपत्रातील गोष्टी मोठ्याने वाचा आणि त्या गोष्टींच्या कात्रणांचा संग्रह करा.
केसरी वर्तमानपत्र कोणी लिहिले?
वर्तमानपत्रात तुम्हाला लिहायला आवडेल का?
शिक्षकांच्या मदतीने रद्दी वर्तमानपत्रापासून टोप्या, कागदी फुले, कागदी चेंडू, कागदी पिशव्या इत्यादी तयार करा.
वर्तमानपत्रातील तुम्हाला न समजलेल्या शब्दांची यादी तयार करा व त्यांचे अर्थ शिक्षकांकडून माहिती करून घ्या.