रंगीत कागदांपासून कोलाज काम करणे | Mindfullness वर आधारित कलाविष्कार, स्थानिक कला व संस्कृतीचा परिचय-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रम २ : रंगीत कागदांपासून कोलाज काम करणे.
पूर्वनियोजित कृती :
शुक्रवारी शेवटच्या तासाला शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देतात व तयारी करण्यास सांगतात. साहित्याची यादी लिहून देतात व साहित्य आणण्यासाठी सांगतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : बौद्धिक कौशल्य, बहुअंगी विचार, आकलन क्षमता वाढ
आवश्यक साहित्य : रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर, कात्री, डिंक, पांढरा कागद, पेन्सिल, उपलब्ध टाकाऊ पेपर, वस्तू इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात. विद्यार्थी गटाने बसवून घेतात व विद्यार्थ्यांना सर्व
साहित्याचे वाटप करतात.
२) दिलेल्या साहित्यातून कृती कशी तयार करायची हे सांगतात. कोणत्या पद्धतीची करायची आहे, ती कृती चित्र स्वरूपात कशी मांडायची आहे या संदर्भात माहिती देतात.
३) कोलाज पद्धतीचे फायदे, त्याचा उपयोग आणि त्याचे सौंदर्य याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून विद्यार्थ्यांना विविध रंगांच्या कागदांचा वापर करून वेगवेगळी
फळे, फुले यांचे चित्र काढण्यास सांगतात.
५) शिक्षक फळे व फुले या चित्रांच्या आकाराचे रंगीत कागदाचे तुकडे करून डिंकाच्या साहाय्याने चिकटवतात.
६) शिक्षक अशा पद्धतीचे कोलाज काम करण्यास शिकवितात. या संदर्भातील नमुना चित्रही विद्यार्थ्यांना दाखवतात. शिवाय विद्यार्थ्यांसमोर कोलाज कामाचे प्रात्यक्षिक करून दाखवितात.
विद्यार्थी कृती :
१) विदयार्थी शिक्षकांनी दाखवलेली कृतीचे निरीक्षण करतात व त्याप्रमाणे अनुकरण करतात.
२) उपलब्ध साहित्यामध्ये कोणते चित्र बनवता येईल याचा विचार करतात. स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या
जोरावर नवनवीन चित्र निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात.
३) काम गटागटाने करत असल्याने एकमेकांमध्ये लागलेल्या स्पर्धेचा, चुरशीचा आनंद घेतात व उपक्रम पूर्ण करतात.